अर्ज स्वीकारण्यावरून पालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये  वाद

(श्रीराम कांदु)

डोंबिवली :- दि. १२ ( प्रतिनिधी ) स्टेशनपरिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका प्रशासन कारवाई करत असताना दुसरीकडे त्यांना स्टेशनपासून १५० मीटर अंतराच्या बाहेर बसण्यासाठी पांढरा पट्टा मारण्यास पालिकेला विसर पडला आहे. बसण्यास जागा मिळावी म्हणून अनेक वेळेला फेरीवाल्यांच्या युनियनने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने फेरीवाल्यांनी न्याय मिळवण्यासाठी मंगळवारी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात आपले अर्ज देण्यास आले होते. मात्र  वेगवेगळे अर्ज स्वीकारण्याचे आदेश प्रशासनाकडून आले नसल्याने पालिका कर्मचाऱ्यानी अर्ज घेतल्यास नकार दिला. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि  फेरीवाल्यांमध्ये वाद झाला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद मिटल्यानंत  फेरीवाल्यांचे अर्ज पालिकेने स्वीकारले.

गेले अनेक महिने स्टेशनपरिसरात फेरीवाल्यांवर पालिका प्रशासन करवाई करत आहे. मात्र त्यांना बसण्यास जागा ठरविण्यास  विलंब लागत असल्याने फेरीवाल्यांनी पालिकेत अर्ज देण्यास गर्दी केली होती. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या गेटवर फेरीवाल्यांना अडवण्यात आल्याने फेरीवाले संतप्त झाले होते. फेरीवाल्यांचे वेगवेगळे अर्ज स्वीकारण्याचे आदेश नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी सांगीतल्यानंतर कष्टकरी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष  बबन कांबळे , सल्लागार प्रशांत सरखोत , महिला अध्यक्षा  मधु बिरमुळे, दोस्ताना ग्रुपचे अभय दुबे यांनी जाब विचारला. वाद चिघळण्याच्या चिन्ह दिसतात पोलिसांनी मध्यस्थी केली. काही वेळाने चर्चा झाल्यावर अखेर विभागीय कार्यालयात फेरीवाल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. याबाबत अध्यक्ष बबन कांबळे म्हणाले , २९ हॉकर्स झोन आहेत. याठिकाणी पालिकेने फेरीवाल्यांना बसण्यास जागा द्यावी.आज आणि उद्या फेरीवाले आपला अर्ज पालिकेला देणार आहेत.  तर सल्लागार सरखोत यांनी पालिका आयुक्त आणि फेरीवाल्यांमधील यांच्यातील चर्चा होत नसल्याने प्रत्येक फेरीवाल्यांना प्रशासनाकडे आपले म्हणणे मांडावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published.