अफवा रोखण्यासाठी व्हाट्सॲपची जनजागृती मोहीम
नवी दिल्ली – खोट्या बातम्या व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने रेडिओच्या माध्यमातूनही जनजागृती मोहीम हाती घेतली आली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशसहित एकूण दहा राज्यांमध्ये या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यास बुधवारपासून सुरुवात झाली.
फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपवरून अफवा, खोटी माहिती पसरविली गेल्याने काही भागांमध्ये जबर मारहाण करून निरपराध लोकांना ठार मारण्याच्या घटना घडल्या होत्या. अफवांचा प्रसार रोखण्यासाठी परिणामकारक पावले न उचलल्याबद्दल व्हॉट्सअॅपचे केंद्र सरकारने कान उपटले होते.
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या या समाजमाध्यमाने रेडिओच्या माध्यमातून बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये २९ आॅगस्टपासून जनजागृती मोहीम हाती घेतली.
१५ दिवसांचा टप्पा ;
व्हॉट्सअॅपचा बुधवारपासून सुरू झालेला जनजागृतीचा दुसरा टप्पा १५ दिवसांचा असेल. त्यात महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, ओरिसा, तामिळनाडू आदी दहा राज्यांत ८३ रेडिओ केंद्रावरून व्हॉट्सअॅपतर्फे जनजागृती करण्यात येईल. या मोहिमेत मराठी, तेलुगू, कन्नड, उडिया, तामिळ, गुजराती, बंगाली, आसामी या प्रादेशिक भाषांतून माहिती दिली जाईल.