अपूर्ण नालेसफाईमुळे कल्याण डोंबिवली तुंबली

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२५ – दरवर्षी प्रमाणे यंदाही महापालिका प्रशासनाने केलेल्या नालेसफाईंचा दावा पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेला. शहराचे नाक असलेल्या शिवाजी चौक ,टिळक चौक,रामबाग,परिसरात तसेच डोंबिवली मधील ठाकुर्ली आजदे गाव कोपर रोड ,मिलाप नगर या ठिकाणी पाणी साचल्याने पालिकेच्या दाव्याची चांगलीच पोलखोल केली.त्यामूळे यंदाही महापालिकेची नालेसफाई होती की ‘नागरिकांनी भरलेल्या कराच्या तिजोरीची सफाई’ असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ५ जूनच्या आसपास कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी अवघ्या काही मिनिटांतच कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेले पाहयाला मिळाले. शहरांतील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गटाराचे पाणी आलेले पाहायला मिळाले.त्यावेळी नालेसफाईचे काम सुरू असून पावसाळा सुरू व्हायच्या आत ते पूर्ण होईल असे आश्वासन महापौर विनिता राणे व पालिका प्रशासनाने यांनी दिली होती. मात्र दोन आठवड्यानंतर परतलेल्या पावसानेच सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचा हा दावा किती फोल आहे ते दाखवून दिले. कल्याणातील शिवाजी महाराज चौक, अत्रे रंगमंदिर रस्ता, पंचायत समिती, रामबाग, टिळक चौक आदी तर डोंबिवलीत एमआयडीसी निवासी विभाग, आजदे गाव, सांगाव, ठाकुर्ली कल्याण ग्रामीण मध्ये नांदीवली,पिसवली आदीवली ढोकली अशा विविध भागात पाणी साचल्याचे आढळले. त्यातही कल्याण डोंबिवली महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिवाजी महाराज चौक आणि पालिकेला लागून असणाऱ्या अत्रे रंगमंदिर परिसरात रस्त्यावर आलेल्या गटाराच्या घाणेरड्या पाण्याने तर पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उभे केले.नालेसफाई आणि ती झाल्याचा महापालिकेचा दावा म्हणजे निव्वळ धूळफेक असते का? मग नालेसफाईच्या नावाने केला जाणारा खर्च जातो कुठे? आणखी किती वर्षे इथल्या लोकांनी असं रडत खडत जगायचं? असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण झाले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email