अथर्व वारंगच्या मारेकऱ्यांना २ महिन्यानंतर अटक – डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१८ – अथर्व वारंग या सात वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृतदेह देसलेपाडा येथील नव्याने बांधण्यात येत असलेल्या सात मजली इमारतीच्या ड्रेनेज टाकीत मिळून आल्याच्या घटना २४ रोजी घडली. कोणताही पुरावा मिळत नसताना अतिशय गुंतागुंतीच्या या गुन्ह्यात मारेकऱ्यांना पडण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान होते. घटना घडलेल्या ठिकाणी आणि आजूबाजूला पोलीस सध्या वेशात फिरून तपास करत होते. अखेर मानपाडा पोलिसांना दोन महिन्यानंतर या गुन्ह्यातील दोन मारेकऱ्यांना पकडण्यास यश आले आहे. अटक आरोपींना २४ जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. यापूर्वी याप्रकरणी ड्रेनेज टाकीवर झाकण न बसवून निष्काळजीपणा केल्याबद्दल पाच बिल्डरांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
एहसान साबीर आलम ( २२ , मूळ गाव, बेतवारी, बिहार ) आणि नदीम जाकीर आलम ( २१ ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या आरोपींना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. कल्याण परिमंडळ- ३ चे पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी पोलिसांनी अथक मेहनत घेऊन आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनी गजाजन काब्दुले, पोलीस निरक्षक ( गुन्हे ) सुरेशकुमार राऊत यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली. खबरीमार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेंद्र भोयर, महेश जाधव, किरण वाघ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे, पोलीस हवालदार घार्गे,पोलीस नाईक सपकाळे, चौरे, पवार, गडगे यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्हाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. इमारतिचे बांधकाम सुरु असताना मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेतली नाही , तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसणे यामुळे सदर गुन्ह्यात आरोपींना गुन्हा करण्यास अधिक सोपे गेल्याच्या गुन्ह्याखाली यापूर्वीच घटनास्थळी सय्यद हसन अहमद, मोनिस अहमद, ऐमान खान, नागेंद्र सिंग आणि विशाल सिंग या पाच विकासकांना मानपाडा पोलिसांनी अटक केली होती.