अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पात्र कर्ज प्रकरणे बँकांनी तत्काळ मंजूर करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.३१ – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत जी पात्र प्रकरणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडे पाठविण्यात आली ती तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे दिले.

हेही वाचा :- पुण्यात मराठा मोर्चातर्फे चक्काजाम आंदोलन

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेसंदर्भातील कार्यवाही याबाबत बैठका घेतल्या.

हेही वाचा :-  कल्याणमध्ये मनसेचे खड्ड्यांवरून पुन्हा एकदा उस्फुर्त आंदोलन !

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व बँक असोसिएशन, राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी यांच्या समवेतील आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, सहकार आयुक्त डॉ.विजय झाडे, कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा :- किरकोळ कारणावरून डोंबिवलीत एका तरुणाची हत्या

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असणाऱ्या तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना व गट प्रकल्प कर्ज योजना या दोन योजना राबविण्यात येत आहे. तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनाही राबविण्यात येत आहे. या योजनांतर्गत ज्या तरुणांची पात्र प्रकरणे बॅकांकडे आहे त्यांना तत्काळ निधी उपलब्ध करुन ती मंजूर करावीत. बँकांनी या योजनांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर यंत्रणांना तसे त्वरीत आदेश द्यावेत व त्याबाबत अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाडीबीटी पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात
शैक्षणिक संस्थांनी विदयार्थी हिताला प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्री महोदयांचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात असून या पोर्टलमुळे विदयार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यास मदत होणार आहे. या शैक्षणिक वर्षांत शैक्षणिक संस्थांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब लागत असला तरी संस्थांनी विदयार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दयावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना आज दिले.

हेही वाचा :- ऑनलाइन च्या माध्यमातून महिलेला ९० हजाराना गंडवले – डोंबिवलीतील घटना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आर. श्रीनिवास, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैदयकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख्,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविदयालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून शिक्षण शुल्काच्या केवळ ५० टक्के रक्क्म विदयार्थ्यांकडून घ्यावी तर उर्वरित ५० टक्के रक्क्म राज्य शासन देणार आहे. परंतु ज्या महाविदयालयांनी विदयार्थ्यांकडून १०० टक्के शुल्क घेतले असल्याची तक्रार आल्या असून त्यावर राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजना ही विदयार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सुरु केली असल्याने याचा फायदा अधिकाधिक विदयार्थ्यांना होणे आवश्यक आहे. आता डीबीटी पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर विदयार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये थेट फी जमा होणार आहे. तसेच शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार शिष्यवृत्तीचे पैसे वेळेत शैक्षणिक संस्थांना जमा व्हावेत अशीच राज्य शासनाची भूमिका आहे.
छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजना ही आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विदयार्थ्यांना लागू असून शैक्षणिक संस्थांनी या योजनेची अंमलबजावणी करीत असताना विदयार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

चौकट – काय आहे छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजना

• छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजनेअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, पदुम, वैदयकीय शिक्षण अशा विभागाअंतर्गत येणाऱ्या तब्बल ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये लागणाऱ्या फी मध्ये ५० टक्के सवलत राज्य शासनामार्फत देण्णत आली आहे.

• या वर्षापासून वैदयकीय आणि दंत वैदयकीय शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांनाही ५० टक्के फी सवलतीचा फायदा मिळणार आहे.

• गेल्या वर्षी या योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपये खर्च झाले असून आतापर्यंत २ लाख ३० हजारहून अधिक विदयार्थ्यांना फायदा झाला आहे.

• या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ९५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email