अच्छे दिनाचा फुगा लवकरच फुटणार : राज ठाकरे
(श्रीराम कांदू )
डोंबिवली : सरकारकडे पैसे नसतानाही नुसते योजना जाहीर करत आहे. शेतकरी कर्जमाफी देखील निव्वळ मुर्ख बनवण्याचे काम आहे. सरकारचा हा खोटारडेपणाचा फुगा लवकरच फुटणार आहे असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला.
राज हे कल्याण डोंबिवलीच्या दौ-यावर आले आहेत त्याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मनसेमुळेच मुंबईतील रेल्वे स्टेशन्सनी मोकळा श्वास घेतला.फेरीवाल्यांना हटवण प्रशासनाची जबाबदारी नाही का? जे प्रश्न प्रशासनाला विचारायचे ते तुम्ही मला विचारता, दुसरे पक्ष काही करत नाहीत त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार नाहीत का? असा प्रतिसवाल राज यांनी पत्रकारांना केला.फेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटीचा हप्ता मिळत असल्याचा आरोपही राज यांनी केला. वांद्रयातील आगी विषयी बोलताना ते म्हणाले की झोपडपट्टींना आगी लावल्या जात आहेत. कच्ची बांधकामे पक्की बांधकामे करण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. झोपडपट्टयांमध्ये परप्रांतियांचे लोंढे वाढले आहेत.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.