अखेर मुुंबै बँक हरली , शिक्षक भारतीचा मोठा विजय

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर मुंबै बँकेने शिक्षकांची वैयक्तिक खाती स्वतःकडे ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत मुंबईतील शिक्षकांचे पगार उशिरा हात असल्याबाबतचा आणि मुुंबै बँकेच्या नावे पगार बिले स्विकारली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर शिक्षण विभागाने मुंबै बँकेशी झालेला करार पूर्णपणे संपुष्टात आल्याचे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले. हा शिक्षक भारतीचा मोठा विजय असून आम्ही शासन निर्णयाचे स्वागत करतो, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. 

३ जून २०१७ ला मा. शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून सुरु असणारे शिक्षकांचे पगार तडकाफडकी मुंबै बँकेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात शिक्षक भारतीने जोरदार विरोध करत मा. हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यानच्या काळात काही संघटना व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जबरदस्तीने मुंबै बँकेत खाते उघडण्याची मोहीम राबवली. शिक्षक, शिक्षकेतरांनी आर्थिक कोंडी करुन मुंबै बँकेत खाते उघडण्याची सक्ती केली. फॉर्म न भरता, केवायसी डॉक्युमेंट न घेता खाते उघडण्याचा धडाका लावला. अखेर ९ फेब्रुवारी २०१८ रोजी मा. हायकोर्टाने ३ जून २०१७ चा शासन निर्णय रद्द ठरवला. हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता शिक्षणमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. तेथेही शिक्षण विभागाचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले.शेवटी हार मानत शिक्षण विभागाला मुंबै बँकेशी केलेला करार समाप्त करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

ज्या मुंबै बँकेची शिफारस शिक्षक परिषद, ज्युनिअर कॉलेज महासंघ, मुख्याध्यापक संघटनेचा एक गट (प्रशांत रेडीज ग्रुप) यांनी केली होती त्यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे  शासनाने स्पष्ट केले आहे. नाबार्डने दिलेल्या अहवालाची दखल घेत शासनाने मुंबई बँकेशी केलेला करार संपुष्टात आणला आहे. सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर यांना आपले वैयक्तिक खाते कोणत्याही बँकेत ठेवण्याचा अधिकार आहे मात्र सॅलरी अकाऊंट राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवावे, असे आवाहन शिक्षक भारतीने केले आहे. मुंबै बँकही भ्रष्टाचारी आणि अत्यंत धोकादायक, असुरक्षित बँक असल्याचा अहवाल नुकताच नाबार्डने जाहीर केला आहे. भविष्यात आपली फसगत होऊ नये, आपल्या घामाचा पैसा बुडू नये, यासाठी प्रत्येकाने आपले सॅलरी अकाऊंट राष्ट्रीयकृत बँकेतच उघडणे आवश्यक आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email