झोमॅटोवर जेवण मागविणे पडले महागात तरुणाला ४९.१६० हजारांचा गंडा
डोंबिवली दि.२७ :- कल्याण पश्चिमेकडे असलेल्या गांधारी रॉयल पॅराडाईज येथे राहणारे पंकज तिवारी याने १८ नोव्हेंबर रोजी सकाळी झोमॅटो ऍपमधून जेवणाची ऑर्डर करण्यासाठी १२७ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोनवर बोलणाऱ्या इसमाने घराचा पत्ता सापडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिवारी यांनी ऑर्डर कॅन्सल करत पैसे परत देण्यास सांगितले. फोनवर बोलणाऱ्या इसमाने याला ५ रुपये जीएसटी भरण्यास सांगितले.
हेही वाचा :- भारतीय मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ बघण्याचे प्रमाण वाढले
त्यासाठी त्याने मोबाईलवर एक लिंक पाठवली. ही लिंक ओपन करून तिवारी याने जीएसटीचे ५ रुपये ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर काही तासातच तिवारी याला त्याच्या दोन बँक खात्यातून एकूण ४९ हजार १६० रुपये ट्रान्स्फर झाल्याचे लक्षात आले. ऑनलाईनद्वारे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर भेदरलेल्या तिवारी याने खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.