‘युवा माहिती दूत’उपक्रमाचा ठाण्यात शुभारंभ योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा उपक्रम – पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि १५ – ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ आज पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नियोजन भवन सभागृहात आज करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.युनिसेफच्या सहयोगाने तसेच उच्च शिक्षण विभागआणि तंत्र शिक्षण विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.याप्रसंगी दत्तात्रय पाटील, आणि अपूर्वा सणस या विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक नोंदणी करण्यात आली.पालकमंत्र्यांनी यावेळी बोलतांना या उपक्रमाद्वारे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल असे सांगितले.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देखील सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मार्फत या योजना लोकांपर्यंत नेण्याचा हा उपक्रम ठाणे जिल्ह्यात निश्चितपणे यशस्वी होईल.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार म्हणाले की, बऱ्याचदा योजनांची परिपूर्ण माहिती लोकांना नसते. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
उपक्रमाचे वैशिष्ट्य
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थींपर्यंत थेटपणे पोहचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
आजमितीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. शिवाय, शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणीसंच अथवा रेडिओ ही माध्यमे ते वापरतात असे नाही. प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साहीतरूण वर्गाचे सहाय्य घेण्याचा ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.
राज्यात ६ हजारपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयामध्ये एकूण सुमारे २३ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान ५ ते ७ टक्के विद्यार्थी म्हणजे किमान १ लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. यावेळी या उपक्रमाची व्हिडिओ क्लिप उपस्थितांना दाखविण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी तसेच पालक यांची उपस्थिती होती. जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी शेवटी आभार मानले.