गाडी चालवताना मोबाईलवर बोलणा-याचा परवाना रद्द होणार
(म.विजय)
मुंबई – गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना किंवा मोबाईल हाताळताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीचा परवाना ३ महिन्यांसाठी रद्द केला जाणार आहे. वाहतूक विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यासोबतच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काही लोकांना हा नवा नियम पटलेला नाही.
हेही वाचा :- श्रीगोंद्याच्या सिंघमची राजकीय दबावातून बदली.
यापूर्वी गाडी चालवताना कोणी मोबाईलवर बोलताना आढळल्यास त्याच्याकडून दंड घेतला जात होता. परंतु या दंडात्मक कारवाईमुळे मोबाईलवर बोलणार्यांचे प्रमाण कमी झाले नाही. या नव्या नियमामुळे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून केवळ दंडावर सुटणे कोणालाही शक्य होणार नाही. राज्यात गेल्या वर्षभरात १६ हजार रस्ते अपघात झाले आहेत.या अपघातांमध्ये १२ हजार २०० जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना आळा बसून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले.