माजी सैनिकांचे कल्याण आणि पुनर्वसन योजना
नवी दिल्ली, दि.२४ – सैन्यदलांमधल्या माजी सैनिकांचे कल्याण आणि पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी काल राज्यसभेत दिली.
रक्षा मंत्री माजी सैनिक कल्याण निधी अंतर्गत या सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी वित्तसहाय्य दिले जाते. त्याचबरोबर राहत्या घराची दुरुस्ती, मुलींचे विवाह, विधवांचे पुनर्विवाह, अंत्यसंस्कार अशा विविध कारणांसाठीही केंद्र सरकारतर्फे वित्तसहाय्य दिले जाते. शारीरिकदृष्टया विकलांग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी खडकी आणि मोहाली येथे पुनर्वसन केंद्रे चालवली जातात. या केंद्रांमध्ये त्यांना कृत्रिम अवयव प्रदान केले जातात. माजी सैनिकांच्या कुटुंबियांना अथवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेतून सहाय्य केले जाते.