कृषी क्षेत्रात सुधारणा घडवण्यासाठी पायाभूत विकास हा एक महत्वाचा घटक : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली, दि.१७ – देशातल्या कृषी क्षेत्रातल्या समस्या कमी करण्यासाठी प्रत्येक संबंधिताने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. विजयवाडा येथे शेतकरी आणि वैज्ञानिक यांच्या संवादात्मक मेळाव्यात ते आज बोलत होते. कृषी क्षेत्र शाश्वत आणि किफायतशीर करुन देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची गरज असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. यासाठी रचनात्मक बदल तसेच केंद्र आणि राज्यसरकारांकडून या मुद्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याला सक्षम करण्यामधे पायाभूत क्षेत्राची महत्वाची भूमिका अधोरेखित करतांना ग्रामीण रस्ते संपर्क सुधारणा, अधिक गोदामांची उभारणी, शीतगृहांची सुविधा, पाणी आणि वीजेचा निश्चित पुरवठा हे यामधले महत्वाचे घटक आहेत.

शेतकऱ्यांना वेळेवर पतपुरवठा करणे ही बाबही तितकीच महत्वाची असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. पिकांमधे वैविध्य आणणे आणि कृषीपूरक जोडधंदा हाती घेणे याबाबतही शेतकऱ्याला शिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ज्या शेतकऱ्यांनी कृषीपूरक जोडधंदा हाती घेतला अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाल्या नाहीत असे एमएएनएजीई ने केलेल्या पाहणीत उघड झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारतात आणि जगातल्या इतर भागातही कृषी क्षेत्राला मोठे प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्राशी निगडित अनेक मुद्यांसंदर्भात एकत्रित आणि समन्वयाने कृतीची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्र बळकट करायला हवे असे ते म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email