आयुष्यमान भारत योजनेसाठी आधार कार्डाचा वापर ऐच्छिक, सक्तीचा नाही -आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली, दि.१२ – केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे सक्तीचे आहे असे वृत्त काही वृत्तपत्रात छापून आले आहे. मात्र हे वृत्त तथ्यहीन आणि निराधार आहे.
आयुष्मान भारत म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानाविषयी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डाचा उपयोग करण्याची सूचना अंमलबजावणी यंत्रणांना देण्यात आली आहे. लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड उपयुक्त ठरेल, मात्र ते सक्तीचे करण्यात आलेले नाही. आधार कार्ड नाही म्हणू कोणत्याही व्यक्तीला या योजनेपायासून वंचित ठेवले जाणार नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी स्पष्ट केले.
आधार कार्ड नसल्यास ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, मनरेगा कार्डही चालणार आहेत असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्याशिवाय अंमलबजावणी यंत्रणांनी लाभार्थ्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी केंद्रे सुरु करावीत, असेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या आयोजनेचे लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेले कुठलेही ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करावे असेही या अधिसूचनेत म्हटले आहे.