यू-मुम्बा संघाचा बोनसचा बादशहा अनुप कुमार कबड्डीतून निवृत्त होणार
मुंबई दि.०२ – अनुप कुमारने आपल्या खेळाने स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अनुप कुमारने प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्या पाच हंगामात यू-मुम्बा संघाचे नेतृत्व केले होते. त्याने प्रो-कबड्डीमधील ९० सामन्यांमध्ये ५९३ गुणांची कमाई केली आहे. सर्वाधिक गुण असलेल्या कबड्डीपटूंच्या यादीत अनुप सहाव्या क्रमांकावर आहे. परंतु, गेल्या काही काळापासून तो विशेष फॉर्ममध्ये नव्हता. त्यामुळे सहाव्या हंगामात यू-मुम्बाने अनुपला खरेदी केले नव्हते. या निर्णयामुळे यू-मुम्बाच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
हेही वाचा :- भारतात लवकरच परतणार सोनाली बेंद्रे !!
सरतेशेवटी अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथरने अनुपला खरेदी केले. मात्र, जयपूरकडून खेळतानाही अनुप फारशी चमक दाखवू शकला नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अनुप प्रो-कबड्डीतून एक्झिट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मध्यंतरी अनुपने निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. मात्र, सहाव्या हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर अनुप कबड्डीतून निवृत्ती घेण्याचा गंभीरतेने विचार करत असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. निवृत्ती घेतल्यानंतर अनुप स्थानिक कबड्डी स्पर्धांमध्ये खेळण्याची शक्यता आहे.