डोंबिवलीत धावतात तीन हजार बेकायदा रिक्षा?
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत नजर जाईल तिथे रिक्षाच दिसतात. दुचाकींची वाढलेली संख्या, अरूंद रस्ते, जिथे रस्ता रूंदीकरण झाले तिथे रिक्षाचालकांनी बेकायदा तळ सुरू केले आहेत. पदपथ धड नाहीत, अशा परिस्थितीत आम्ही चालायचे कुठून, असा प्रश्न सर्वसामान्य डोंबिवलीकर विचारत आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल तीन हजार बेकायदा रिक्षा शहरात धावत असल्याने ही परिस्थिती किती गंभीर आहे, याचा सहज अंदाज येतो. शहरातील दळणवळणाच्या साधनांमध्ये कल्याण- डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा प्रवाशांच्या नजरेत सपशेल अपयशी ठरत आहे. प्रवाशांना इच्छा नसतानाही रिक्षाचा पर्याय वापरावा लागतो. परिणामी डोंबिवलीत रिक्षाचालकांची मक्तेदारी झाली आहे. यातूनच काही उपद्रवी रिक्षाचालक मनमानी कारभार करून प्रवाशांशी हुज्जत घालतात. या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. बेकायदा रिक्षा चालवणे, स्टँडचे नियम न पाळणे, राजकीय वरदहस्त मिळवून वाहतूक नियमांना पायदळी तुडवणे, हम करे सो कायदा अशा अविर्भावात प्रवाशांना उद्धट वागणूक देऊन गुंडगिरी करणे आदी घटनांनी प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत.
हेही वाचा :- डोंबिवलीत उद्योगपतीच्या घरात चोरी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला
वाहतूक पोलिसांचा कानाडोळा आणि आरटीओ विभागाचा वचक नसल्याने शहरात अनागोंदी कारभार वाढत चालला आहे. या बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील विविध पक्षांच्या तसेच अन्य रिक्षा संघटनेच्या पदाधिकाºयांनी एकमुखाने केली आहे. कारवाईच्या मागणीसाठी सर्व संघटना एकत्र येणे, हे चांगले द्योतक असून आता या कारभारावर कसा वचक निर्माण करायचा, हे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण परिवहन क्षेत्रात ४२ हजार रिक्षा असून त्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड आणि बदलापूर आदी भागांमध्ये धावतात. कल्याण, डोंबिवली परिसरात तीन हजार रिक्षा बेकायदा असून, गेल्या वर्षभरात विविध ठिकाणच्या कारवायांमध्ये सुमारे ६०० बेकायदा रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे ससाणे यांनी सांगितले; मात्र तरीही तीन हजारांहून अधिक बेकायदा वाहने रस्त्यावर बिनबोभाट धावत असतील तर ही परिस्थिती गंभीर नाही का, हा प्रश्न यंत्रणेला का भेडसावत नाही. त्यामुळे निर्माण झालेला पेच कुणी सोडवायचा आणि त्याला कोणी व का सामोरे जायचे, हा मोठा सवाल आहे. सुशिक्षितांच्या शहरामध्ये सिग्नल यंत्रणेचा अभाव आहे, झेब्रा क्रॉसिंग नाही, वेग मर्यादा नाही की रांगेची शिस्त नाही. त्यामुळे सगळा अनागोंदी कारभार दिसून येत आहे.
हेही वाचा :- ठाण्यात धावत्या रिक्षात महिलेशी अश्लील वर्तन
एकीकडे वारेमाप भाडे आकारले जाते, मीटर सक्ती असतानाही कोणताही रिक्षाचालक मीटर लावत नाही, ठाण्याचे उदाहरण केवळ नावालाच असून तेथील वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकाºयांना शहरातील समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे उपद्रवींचा शहरामध्ये हैदोस सुरू असून प्रवासी मात्र भरडलेजात आहेत. सीएनजी आली पण आजही याठिकाणी पेट्रोलचे दर आकारून प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे. ठाण्यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी १८ रूपये आकारण्यात येत असतानाच कल्याण, डोंबिवलीत मात्र पहिल्या टप्प्यासाठी २० रूपये आकारले जातात. घारडा, एमआयडीसी, नांदिवली, कल्याण फाटा आदी ठिकाणी स्वतंत्र जायचे असेल तर किती भाडे आकारले जाईल याचा काहीही अंदाज नसतो. प्रवाशांना नाना अनुभव येत असल्याने ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशा अवस्थेत नागरिक वावरत आहेत. तक्रार करायची झाली, तर वाहतूक नियंत्रण विभागाकडे तगादा लावावा लागतो. आरटीओच्या कल्याण कार्यालयात जायचे, तर दिवसाचा खोळंबा होतो. शिवाय तिथे गेल्यावरही काम होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मनमानी कारभारास विरोध करायचा कुणी प्रयत्न केला, तर त्या चांगल्या माणसाच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले जाते, हा अनुभव सातत्याने नागरिकांना येतो. ही गंभीर परिस्थिती असूनही अधिकारी निष्काळजी असतील, तर आगामी काळात सुशिक्षितांचे हे शहर काही मुजोर रिक्षाचालकांचे संस्थान बनेल आणि ते संस्थान खालसा करणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनेल, अशी विचित्र स्थिती आहे.