शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाचे काम एक वर्षानंतर अखेर पूर्ण
Hits: 0
डोंबिवली दि.०२ :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाचे काम गेले वर्षभर अत्यत संथ गतीने सुरू होते. यामुळे वैद्यकीय अधिकारी नाराज होते. सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते ते आता एक वर्षांनी पूर्ण झाले आहे. यामुळे डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम असेच रखडले होते याला प्रसिद्धी माध्यमांनी वाचा फोडली व मग प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी रुग्णालयाच्या व्हरांडा व गळती रोखण्याचे दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र शस्त्रक्रिया विभागाचे काम खूप संथ चालू होते. ज्येष्ठ डॉक्टर अरविद प्रधान यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा :- अभिनेते शरद पोंक्षे यांना स्वा. सावरकर पुरस्कार
गेल्या वर्षी 1 डिसेंबरला हा विभाग दुसऱ्या मजल्यावर हलवण्यात आला व तळ मजल्यावरील शस्त्रक्रिया विभागाचे काम सुरू करण्यात आले पण ठेकेदार हे काम खूप संथ पणे करत होता. दुसऱ्या मजल्यावर तात्पुरते शत्रक्रिया गृह हलवण्यात आले असले तरी ते अपुरे पडत असल्याचे डॉ प्रधान म्हणाले डोंबिवली पूर्वचे सूतिकागृह गेले चार वर्षे धोकादायक इमारत म्हणून बंद करण्यात आले व टिळक रोडवरील घरडा धर्मदाय हॉस्पिटल बंद करण्यात आले. यामुळे सर्व ताण शास्त्रीनगर रुग्णालयावर पडत असल्याचे कर्मचारी सांगतात.
हेही वाचा :- ठाण्यात पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे आयोजन
या रुग्णालयात महिन्याला 300 महिला प्रसूत होतात, पैकी सुमारे 85 महिलांचे सिझेरियन 40 महिलांचे कुटुंब नियोजन ऑपरेशन करावे लागते याकडे लक्ष वेधण्यात आले. तळ मजल्यावरील शस्त्रक्रिया विभाग प्रशस्त असून गेले वर्षभर बंद असल्याने फारच गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले. एक वर्षांनी का होईना शस्त्रक्रिया विभाग काम झाल्याने डॉक्टर, कर्मचारी यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रशेखर सावकारे यांना विचारले असता ते म्हणाले, आता हॉस्पिटलमध्ये अधिक काम होईल यासाठी ठोक वेतनावर डॉक्टर तातडीने नियुक्त करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.