केडीएमसीच्या रस्त्यावर शिजतेय दम बिर्याणी फुटपाथसह आता रस्त्यावरही अतिक्रमण
कल्याण दि.०२ :- कल्याण पूर्वेकडे असलेल्या यु टाईप रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मध्यंतरी शिवसेने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पोलिसांसमक्ष निवेदन दिले होते. या निवेदनानुसार दहा दिवसांची मुदत प्रभाग 4 जे अधिकाऱ्यांनी शिवसेनेकडे मागितली होती. या दहा दिवसांत अतिक्रमणे हटविणे अपेक्षीत होते. एकीकडे या दहा दिवसांची मुदत केव्हाच संपुष्टात आली असून कारवाई मात्र काहीच न झाल्याने दुसरीकडे आता पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. या प्रभाग क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी आता पदपथाखालीही पाय पसरायला सुरुवात केल्याचे तेथे शिजणाऱ्या दम बिर्याणीवरून दिसून येते.
हेही वाचा :- शेतीविषयी फार ज्ञान पाजळत नाही, पण बळीराजानं मनसेच्या पाठीशी राहावं- राज ठाकरे
पुना लिंक रोडच्याकडेला एका चिकण बिर्याणी व्यवसायीकाने पदपथासह चक्क रस्त्यावर चुली मांडून बिर्याणी शिजविण्यास प्रारंभ केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील नागरीकांमध्ये केडीएमसीच्या नाकर्तेपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच 4 जे प्रभाग क्षेत्रात असलेल्या विठ्ठलवाडी स्मशानभूमितील दफनभूमिवर सुलभ शौचालय बांधण्याचा घाट घातला जात होता. परंतु समाज माध्यमांवर या प्रकाराविषयी टिकेची झोड उठल्यानंतर सद्या हे बांधकाम थांबविण्यात आल्याचे दिसून येत आहे. परंतु लोकग्रामकडे जाताना उजव्या हाताच्या पूना लिंक रोडवर असलेल्या व्यापारी गाळ्यांपैकी एका गाळ्यात नुरी कॅटरर्स नावाचे एक बिर्याणी बनविण्याचे हॉटेल आहे. या हॉटेल मालकाने आपल्या गाळ्यासमोरील पदपथ गेली अनेक महिने आपल्या सामानाने व्यापून टाकला आहे.
त्यामुळे येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरीकांना भर रस्त्यातुन वाहनांच्या अडथळ्यातुन पुढे जावे लागत आहे. आता या हॉटेल मालकाला आपला व्यवसायासाठी पदपथही कमी पडू लागल्याने त्याने आता पदपथाच्या खाली उतरून भर रस्त्यावर चुली मांडून बिर्याणी शिजविण्यास सुरुवात केली आहे. या चुलींना खेटूनच वाहन चालकांना वाहने पुढे न्यावी लागत असल्याने या ठिकाणी मोठया प्रमाणावर अपघात होऊन जिवीतहानी होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. अश्याच प्रकारे चक्की नाका ते थेट प्रभाग ड कार्यालयादरम्यान असलेल्या पदपथ व्यापाऱ्यांनी फुटपाथवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे केली असल्याने नागरीकांत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Please follow and like us: