कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम दोन महिन्यात पूर्ण..
डोंबिवली दि.१७ – दिवा व डोंबिवली रेल्वे स्थानकाच्यामध्ये असलेल्या कोपर स्थानकावर वाढणारी गर्दी व अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवासी त्रस्त आहेत त्यातच गेल्या वर्षात या स्थानकावर गेल्या वर्षात ६६ प्रवाशांचे बळी गेले आहेत. हे लक्षात घेऊन प्रवाशांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने कोपर रेल्वे स्थानकावर होम प्लॅटफॉर्मचे बाधण्याचा निर्णय घेण्यात आला. १ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे हस्ते या कामाचे भूमिपुजनही संपन्न झाले होते. मध्यंतरी रखडलेले काम सध्या युध्दपातळीवर सुरु करण्यात आले असून येत्या दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार आहे.
हेही वाचा :- अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध – अध्यक्ष मंजुषा जाधव
कोपर रेल्वे स्थानकावर जिना अरुंद असून अप्पर कोपरमार्गे वसई,पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत आहे. हे लक्षात घेऊन खासदार डॉ. शिंदे यांनी पूलाचे रुंदीकरण करण्यात यावे व होम फलाट बांधावा यासाठी पाठपुरावा केला होता. नोव्हेंबर १८ नंतर भूमिपूजन होऊनही काम थंडावले होते. मात्र रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे होणारे वाढते अपघाती मृत्यु लक्षात घेऊन प्रशासनाने होम फलाट बांधण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पूलाचे रुंदीकरणही करण्यात येणार आहे. त्याचीही तयारी सुरु असल्याचे सांगण्यात आले.रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या होम फलाट बांधण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे. यामुळे पश्चिमेला जाणाऱ्या प्रवाशांना त्या दिशेने स्टेशन बाहेर जाणे व स्टेशनवर येणे सोयीचे होणार आहे. यामुळे जिन्यावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
तरीही कोपर रेल्वे रुळ ओलांडणे सुरुच….
कोपर रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षभरात सुमारे ६६ प्रवासी विविध अपघातात मरण पावले होते. रेल्वे प्रशासन सतत प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडू नका असे सतत सांगत असले, तरी प्रवासी ते मनावर घेत नाही. अजूनही प्रवासी रूळ ओेलांडून जात असल्याचे दिसत आहे. कोपर ब्रिजजवळ एक रेल्वे पोलीस उभा असतो पण त्यांनाही प्रवासी दाद देत नाहीत असेच दिसत आहे हे सर्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने होम फलाट तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.