“रियुनाइट” मोबाईल ॲपचा सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली, दि.२९ – हरवलेल्या आणि सोडून दिलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी साहाय्यकारी ठरणाऱ्या “रियुनाइट” या मोबाइल ॲप्लिकेशनचा शुभारंभ आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला. हे ॲप विकसित केल्याबद्दल प्रभू यांनी सामाजिक संस्था बचपन बचाव आंदोलन आणि कॅपजेमिनी यांचे कौतुक केले.
हरवलेल्या मुलांची पुन्हा त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणण्याकरिता केलेले हे प्रयत्न म्हणजे वास्तवातील सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा केलेला उत्तम वापर असल्याचे मत प्रभू यांनी यावेळी व्यक्त केले.
बेपत्ता मुलांची छायाचित्रे, नाव-पत्ता यासह संपूर्ण माहिती, पोलीस ठाण्यातली नोंद या ॲपवर पालक आणि नागरिक देऊ शकतात. छायाचित्रांचे मोबाईल फोनच्या फिझिकल मेमरीत जतन होणार नाही. ॲण्ड्राइड आणि आयओएस दोन्हीवर हे ॲप उपलब्ध आहे.
नोबेल पुरस्कार विजेते आणि बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक कैलाश सत्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.