देशात विकसित होणाऱ्या जलमार्गांची सद्यस्थिती
नवी दिल्ली, दि.२२ – वाहतुकीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत जलमार्ग विकसित करत आहे. देशात सध्या 111 राष्ट्रीय जलमार्ग सक्रीय आहेत. महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, आसाम, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, गोवा आणि गुजरातमध्ये हे जलमार्ग वापरात आहेत. महाराष्ट्रात अम्बा नदी, रेवदांडा खाडी आणि कुंडलिका नदी क्षेत्रात हे जलमार्ग सक्रीय आहेत.
देशातील नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ते आणि रेल्वेमार्गाबरोबरच आणखी एक परवडण्याजोगा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे जलमार्ग विकसित केले जात आहेत. आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशात आणखी 36 ठिकाणी राष्ट्रीय जलमार्ग विकसित करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे स्पष्ट झाले, त्यापैकी 8 जलमार्ग 2017-18 या वर्षात विकसित करण्याचे काम सुरु आहे.