डोळ्यांदेखत कांद्याची झाली माती..
बीड दि.२२ :- कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नावर परतीच्या पावसाने पाणी फिरवले. लाखो रूपये खर्च करून जोपासल्या कांद्याचा हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याचे भाव कडाडले मात्र पावसाने वांदे केले. यात बीड तालुक्यातील अंधापूरी गावातील बबनराव टेकाळे या शेतकऱ्यांच्या चार एकर कांद्याला पाणी लागल्याने कांदा आतून सडला. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने कांद्याच्या उभ्या पिकात ट्रक्टरने रूटर फिरवले. डोळ्यांदेखत कांद्याची माती झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी थांबले नाही, अशीच परिस्थीती बीड जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीतील पक्षी अधिवास धोक्यात!
बीड तालुक्यातील अंधापुरी गावचे बबन टेकाळे यांनी त्यांच्या चार एकर शेतामध्ये कांद्याची लागवड केली होती. सुरुवातीला कमी पाऊस आल्यामुळे टँकरने पाणी देऊन या कांद्याची जोपासना केली होती. मात्र, दिवाळीच्या दरम्यान हे कांदा काढणीला आला. मात्र परतीच्या पावसाने पुरती वाट लावली. यात पाच एकर कांद्यासाठी 90 हजार रुपयांचा खर्च करून त्यामध्ये मात्र काहीच उत्पन्न मिळाले नाही. .यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उभ्या कांद्याच्या पिकांमध्ये रूटरमारले डोळ्यादेखत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले कांद्याचे पीक मातीमोल झाल्याने बबनरावांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आले. मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता येईल, तसेच कुटुंबासाठी पाहिलेली स्वप्न मातीमोल होताना पाहिले. दुष्काळामध्ये शेतात काही पिकले नाही आणि त्यानंतरच्या झालेल्या परतीच्या पावसाने मात्र हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
हेही वाचा :- शिवसेना आणि राष्ट्रवादी, पत्त्यांचा क्लब, ; राज ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली
परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मोडकळीस आला आहे. कांद्याच्या पिकातून दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न तर कधीच भंगले. मुसळधार पावसामुळे कांदा जमिनीतच सडला. विशेष म्हणजे हजारो हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाल्यानंतरही अद्याप प्रशासनाने कुठलेही पंचनामे केले नाहीत. फक्त कागदोपत्री घोडे नाचवले जात आहेत. पंचनामे केल्याचे दाखवले जात आहे. मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांदावर कोणीच आले नाही. यामुळे शेतकऱ्याला खूप मोठा फटका बसणार आहे. कांद्यासारख्या नगदी पिकांने धोका दिल्याने शेतकऱ्याचे लाखो रूपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. काय करावं, लोकांची देणी कशी द्यावी, असे सांगताना बबनराव डोळ्यात आलेले पाणी लपवू शकले नाही.