आयपीएस रश्मी शुक्लांना दणका! बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आयपीएस रश्मी शुक्लांना दणका! बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख व आयपीएस (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या अडचणीत आल्या आहेत.

त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा फोन टॅपिंगप्रकरणी (Phone Tapping) हा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या रश्मी शुक्ला या प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये आहेत.

फोन टॅपिंगबाबत चौकशीसाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केला आहे.

यानंतर सरकारने पुणे पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शुक्ला यांनी नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दणका देत त्यांची मागणी फेटाळून लावली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) वर्ग करावा, अशी मागणीही शुक्ला यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानेही त्यांची ही मागणीही फेटाळून लावली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर आरोप केले होते.

हा अहवाल केंद्रीय गृह सचिवांकडे देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी 27 मार्चला राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.