जहाज बांधणी क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी लवकरच “जहाज बांधणी पोर्टल”ची सुरुवात- ई मॉड्युल्सच्या उद्घाटनप्रसंगी मनसुख मांडवीय यांची माहिती
मुंबई, दि.३० – जहाज बांधणी क्षेत्रातल्या सर्व हितसंबंधी गटांना एक समान व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीने ग्राहकाभिमुख आणि जागतिकदृष्ट्या उपलब्ध असे पोर्टल लवकरच सुरु केले जाणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाज बांधणी विभागाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. मांडवीय यांच्या उपस्थितीत आज या शिपिंग पोर्टलबद्दल मुंबईत संबंधितांशी झालेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या पोर्टलमुळे जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्रात पारदर्शकता तसेच कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पोर्टलमुळे प्रमाणपत्रे आणि मंजुऱ्या मिळवण्याच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप टाळला जाईल असे त्यांनी सांगितले.
सागरी क्षेत्राची दिवसेंदिवस प्रगती होत असून त्यात जहाज बांधणी महासंचालकांची भूमिका महत्वाची आहे असे ते म्हणाले. या पोर्टलवर या क्षेत्राशी संबंधित सर्व प्रशिक्षण संस्था, सागरी मालवाहतूक सेवा पूरवणारे मध्यस्थ, विविध शिपिंग कंपन्या हे सर्व एक असतील. यातून केवळ डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होणार नाही तर सुप्रशासनालाही हातभार लागेल असे ते म्हणाले.
भारताला 700 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून प्राचीन काळापासून देशात सागरी मार्गाने व्यापार होत आहे. मात्र असे असले तरी जागतिक व्यापाराच्या तुलनेत भारताचा व्यापार कमी आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र गेल्या चार वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने सागरी मालवाहतुकीत 42 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे तसेच यातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मांडवीय यांच्या हस्ते भर्ती सेवा संस्थेच्या ई-मॉड्युलचेही उद्घाटन झाले तसेच सागरी प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटनही त्यांनी केले.