कल्याण-डोंबिवली महापालिका बरखास्त करा
डोंबिवली दि.२४ – महापालिकेची ढासळलेली आर्थिक स्थिती, नियमबाह्य होणार्या महासभा, लोकप्रतिनिधींकडून पायदळी तुडवले जाणारे सभासंकेत, विद्यमान महापालिका सचिवांना सभासंकेताप्रमाणे महासभेचे कामकाज चालवण्यात आलेले अपयश पाहता महापालिका बरखास्त करून प्रशासकीय राजवट लागू करण्याची मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. प्रकाश भोईर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात, महिन्यातून एकदा होणारी महासभा कधी ही वेळेवर सुरू होत नाही. त्यातच सत्तारूढ युतीचे नगरसेवकच मोठ्या प्रमाणात गदारोळ घालतात. या नगरसेवकांमध्ये आपआपसात शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. महिला नगरसेविकांनी आयुक्तांच्या अंगावर बांगड्या भिरकवणे, बांगड्यांचा आहेर देणे, अशा घटनाही घडल्या आहेत. वारंवार असे प्रकार घडत असल्याने एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता भोईर यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा :- सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून प्लास्टिकमुक्त गाव अभियानाचा शुभारंभ प्रत्येक गावात कापडी पिशवीचे वाटप
तसेच अशा सभांमधील गैरप्रकार थांबवणे सभा संकेताप्रमाणे सभेचे कामकाज हातळण्याचे कसब सचिवामध्ये नसल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे. तसेच पालिका हद्दीत कोणतेही नियोजनबद्ध नागरी विकास काम होत नसून केवळ तेच गटार, त्याच पायवाटा तेच रस्ते केले जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून अंदाजपत्रकात सातत्याने स्पिल ओव्हर वर्कची कामे येत असून आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. नागरिकांचा कर रुपी पैसा कर्मचार्यांचे वेतन,गटार, पायवाटांवर खर्च होत आहे. 27 गावांचा समावेश केल्यानंतर हद्दीवाढीचा लाभ, एलबीटीचे अनुदान सरकारडून आजतागायत मिळलेले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी निवणुकीच्या वेळी जाहीर केलेले साडे सहा हजार कोटींही मिळाले नसल्याचे भोईर यांनी या पत्रात नमुद केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आर्थिक दिवाळखोरीकडे जात असल्याचे सूतोवाच तत्कालीन आयुक्त तसेच आताच्या आयुक्तांनी सभांमध्ये केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीतुन महापालिकेस आर्थिक शिस्त लागावी व ही महापालिका टिकावी यासाठी शासन स्तरावरून प्रशासकाची व महापालिका सचिवांची नेमणूक करावी व प्रशासकीय राजवट लागू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.