राजेंद्र काशिनाथ पंडित यांची पोस्ट… एका संघ स्वयंसेवकाच्या नजरेतून शिवसेनेचे राजकारण

Hits: 0

मी एक संघ स्वयंसेवक आहे. बालपणापासून शाखेत जायचो. अनेक वर्षे संघाचे काम केले. काही जबाबदाऱ्या देखिल पार पाडल्या. मी संघकार्यासाठी देशभर प्रवासही केलेला आहे. आता मी साठीला आलोय. महाराष्ट्रात आज जी राजकीय परिस्थिती आहे त्यावर मी आपले विचार मांडत आहे. मी काही राजकीय समीक्षक नाही. पण आज मी जेव्हा शिवसेनेचे राजकारण पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटत नाही. बालपणापासूनच शिवसैनिक संघ स्वयंसेवकांची खिल्ली उडवताना मी पाहिले आहे. “संघ दक्ष, पोरींकडे लक्ष” असे शिवसैनिक चिडवायचे. जुने मार्मिक काढून बघितले तर त्यातही जनसंघाची टर उडविलेली दिसेल. शिवसैनिक स्वतःला आक्रमक म्हणवतात व संघ कसा बुळचट व मूळमुळीत आहे हे आवर्जून सांगत असतात. मात्र आणीबाणीच्या वेळेला याच बुळचट स्वयंसेवकांनी लोकशाही वाचवण्यासाठी हजारोच्या संख्येने आंदोलन केले व अनेकांनी थोडथोडके नव्हे तर एकोणीस महिने तुरुंगवास भोगला. ज्यांना शिवसैनिक ‘बोबड्या’ असे चिडवतात त्या किरीट सोमय्यांनी रस्त्यावर उतरून याच आणीबाणी मध्ये बेदम लाठीमार सहन केला आहे व तुरुंगवास भोगला आहे. त्यावेळेला शिवसैनिक गप्प बसले होते. इंदिरा गांधींचा एक फोन गेल्यावर शिवसेना आणीबाणीला पाठिंबा देऊन मोकळी झाली. शिवसेनेचे निदान १९८५ पर्यंत तरी काँग्रेसला मदत करण्याचे धोरण होते. १९८० ला तर त्यांनी विधानसभेला एकही उमेदवार उभा केला नव्हता, ते अंतुलेच्या प्रेमापोटी हे सर्वानाच माहित आहे. मुंबईच्या महापौरपदी आपला मनुष्य बसावा यासाठी मुस्लिम लीग बरोबर शिवसेनेने समझोता केला. त्यावेळेला मुस्लिम लीगने वंदेमातरमला विरोध केलेला होता. ‘मराठी, मराठी’ अश्या घोषणा देऊन मराठी माणसाच्या आशा पल्लवित केल्या. सुरुवातीच्या काळात स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून चांगले कामही केले. याचे श्रेय सुधीरभाऊ जोशी व गजानन कीर्तिकर यांना जाते. मात्र नंतर अनेक ठिकाणी त्यात्या उद्योगातील सेनानेत्यांनी फक्त तोडपाणी करून स्वतः चा गल्ला भरून घेतला.

हेही वाचा :- सत्तेसाठी सर्वच पक्ष एकमेकांच्या मागे; मात्र मनसेचे थांबा आणि वाट पाहा

चंद्रिका केनिया, प्रीतिश नंदी, कन्हैयालाल गिडवानी, मुकेश पटेल या अमराठी लोकांना राज्यसभेत किंवा विधानपरिषदेत पाठवले ते कुठल्या कारणाने हे लोकांना समजत होते. ही यादी अजूनही वाढवता येईल. फुकटचे श्रेय उपटणे व कायम फोकस मध्ये आपण राहिले पाहिजे ह्या दोनच गोष्टींवर सेनेचे राजकारण फिरत राहिलेले आहे. अयोध्येला जेव्हा वादग्रस्त वास्तू संघ स्वयंसेवकांनी ध्वस्त केली तेव्हा सुंदरसिंह भंडारी यांनी मूर्खासारखे विधान केले. त्याचा फायदा यांनी लगेच घेतला. त्यातही “जर शिवसैनिकांनी हे केले असेल तर मला त्याचा अभिमान आहे” अशी जरतरची भाषा केली. वास्तविक पाहता शिवसेनेचा या आंदोलनाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. राष्ट्रपती निवडणुकीत सेनेने भाजपला डिवचण्याचे धोरण ठेवले. १९९७ मध्ये शेषन यांना पाठिंबा, २००७ मध्ये भैरोंसिंग शेखावत ऐवजी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना, तर २०१२ मध्ये काँग्रेसच्याच प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी १५१ च्या बाल हट्टापायी युती तुटली. त्यावेळेला सामना अक्षरशः गरळ ओकत होता. एकदा तर त्यात प्रत्यक्ष दामोदरदास(म्हणजे मोदींचे वडील) खाली उतरले तरी भाजप जिंकणार नाही असे छापून आले होते. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या एका आंदोलनात “एव्हढी माणसे कशाला, मोदींच्या मयताला” अश्या नीच घोषणा दिल्या गेल्या. सामनाने दुसऱ्या दिवशी ते चवीने ठळकपणे छापले. यावर काही वाहिन्या उभय बाजूने असे बोलले गेले असे खोटे सांगतात. पण भाजपच्या कुठल्या नेत्याने उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांवर अशी खालच्या पातळीवर व खोटी टीका केली त्याचे उदाहरण देत नाहीत. यावेळीही सत्तावाटपाबद्दल दावे-प्रतिदावे करण्यात आले. अमित शहा यांचा १३/१०/१९ ची मुलाखत बघता निवडणुकीच्या आधीच त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितले होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील व या पदाच्या वाटपाचे काहीही ठरलेले नाही. तसेच प्रत्येक सभेत मोदी व अमित शहा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील असे म्हणत होते. हे स्पष्ट आहे की शिवसेनेला भाजप व सेना मिळून २०० च्या वर येतील असे वाटत होते आणि राष्ट्रवादी व काँग्रेस यांना फारशा जागा मिळणार नाहीत असेही वाटत होते.

हेही वाचा :- राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस

मात्र निकाल वेगळे लागले व सेनेची नियत फिरली. निकालाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना उद्धव ठाकरे यांनी सर्व पर्याय खुले आहेत असे म्हटले. केवळ व्यक्तिगत महात्त्वाकांक्षेपोटी युती तोडली व राष्ट्रवादी च्या मागे धावत गेले. अमित शहा यांनी मातोश्रीवर आले पाहिजे असे म्हणणारे शरद पवार यांनी मातोश्रीवर येऊन बोलणी करावी असे का म्हणत नाहीत? या देशात सर्वात कुजकट राजकारण केले ते समाजवाद्यांनी. जनता पक्ष फुटला तो समाजवाद्यांमुळे. शिवसेनेतही सुरवातीला प्रजा समाजवादी पक्षाला मानणारेच लोक होते. प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, मधुकर सरपोतदार ह्यांचा उगम तिथलाच हे खूप लोकांना माहीत नाही. सध्या वाहिन्यांचे नायक ठरलेले संजय राऊत देखील समाजवादी माधव गडकरी यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. शरद पवार यांनी त्याला शिवसेनेत अलगद ‘प्लॅन्ट’ केला हे राजकीय वर्तुळात बहुतेकांना माहित आहे. बऱ्याच वाहिन्या संघद्वेष्ट्या असल्यामुळे ते वाटेल ते बरळतात किंवा एखाद्याने धडधडीत खोटे म्हटले तरी ते भाजपच्या विरोधात जात असेल तर सत्य सांगत नाहीत. उदाहरणार्थ, शिवसेना अशी बोंब ठोकत आहे की बहुमत सिध्द करायला भाजपला ४८ तास आणि आम्हाला फक्त २४ तासच दिले आणि वाहिन्या त्याची री ओढतात. वास्तविक पाहता शिवसेनेला ४८+२४ असे ७२ तास होते व राऊत आधीच फुशारक्या मारत होते की आमच्याकडे १७५ आमदार आहेत म्हणून. मग भाजपचे ४८ तास संपताच त्यांनी १७५ आमदारांच्या सह्यांचे पत्र का दिले नाही? तीच गत राष्ट्रवादीची. त्यांना संध्याकाळी ८.३० वाजेपर्यंत वेळ दिलेला होता मग राष्ट्रपती राजवट आधीच का लागू केली असा मूर्ख प्रश्न वाहिन्या विचारतात. ते हे सांगत नाही की सकाळी ११.३० वाजताच राष्ट्रवादीने सांगितले होते की आम्हाला अजून ४८ तास हवेत. थोडक्यात, संध्याकाळी ८.३० वाजेपर्यंत ते बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. मग राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय काय पर्याय होता? थोडक्यात शिवसेनेच्या स्वार्थी व दगाबाज राजकारणामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यांचा इतिहास पाहता त्यात काहीही आश्चर्य नाही. कळीचा मुद्दा हा आहे की संघ व भाजप यातून बोध घेणार की नाही?

Leave a Reply

Your email address will not be published.