सुरत येथे होणाऱ्या युवा परिषदेतही पंतप्रधान सहभागी होणार
नवी दिल्ली, दि.२९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरातमधल्या सुरत आणि दांडी या गावांचा दौरा करणार आहेत. सुरत विमानतळावर टर्मिनल इमारतीच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. विमानतळ परिसरात 25,500 चौ. मी. जागेवर 354 कोटी रुपये खर्च करून ही इमारत बांधली जाणार आहे. पर्यावरण स्नेही बांधकाम असलेल्या या इमारतीत सौर ऊर्जा आणि एलईडी लाईटचा वापर केला जाईल. ही इमारत पूर्ण झाल्यावर सुरत विमानतळाची प्रवाशी क्षमता दररोज 1800 प्रवाशांपर्यंत वाढू शकेल. गुजरात राज्यात अहमदाबाद आणि वडोदरानंतर सुरत हे तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे विमानतळ आहे. विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे. यादृष्टीने विविध क्षेत्रात अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. गुजरात राज्यात नागरी हवाई प्रवासासाठी पायाभूत सुविधा विस्तारल्यामुळे हवाई वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. यात कांडला बंदर ते मुंबई आणि पोरबंदर ते अहमदाबाद आणि मुंबई अशा विमानसेवा उडान योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहेत. त्याशिवाय हिरासार, राजकोट या ठिकाणी ग्रीन फिल्ड विमानतळ, अहमदाबाद आणि वडोदरा एटीसी टॉवर इत्यादी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारले; तुमचा मुलगा PUBG खेळतो का?
सुरत येथे पंतप्रधान नवभारत युवा परिषदेत सहभागी होत युवकांशी संवाद साधतील. तसेच श्रीमती रसिलाबेन सेवंतीलाल शहा विनस रुग्णालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नवसारी जिल्ह्यात दांडी येथे जातील. या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या स्मारकात महात्मा गांधी यांच्यासह दांडी यात्रेत सहभागी झालेल्या 80 सत्याग्रहींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्याशिवाय या स्मारकात ऐतिहासिक दांडी यात्रेचे वर्णन करणारे 24 भित्तीशिल्प लावण्यात आलेली आहेत. पंतप्रधान या स्मारकाला भेट दिल्यावर जनतेशी संवाद साधतील. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात 1930 साली झालेल्या दांडी यात्रेचे विशेष महत्त्व आहे. या यात्रेपासूनच महात्मा गांधी यांनी ब्रिटीश साम्राज्याविरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. साबरमती आश्रमापासून दांडी येथे 241 मैलांचा प्रवास करून महात्मा गांधी यांनी समुद्रकिनाऱ्यावर मीठ उचलले होते. ब्रिटीश सरकारने मीठावर लावलेल्या कराचा निषेध करणारा हा प्रतिकात्मक मोर्चा स्वातंत्र्य लढ्यात मैलाचा दगड ठरला. पंतप्रधान मोदी यांचा हा या महिन्यातला दुसरा गुजरात दौरा आहे.