पंतप्रधान अंदमान आणि निकोबार बेटांचा दौरा करणार
नवी दिल्ली, दि.२८ – पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 डिसेंबर 2018 ला अंदमान-निकोबार बेटांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान 29 डिसेंबरच्या संध्याकाळी पोर्ट ब्लेअरला पोचतील. ते 30 डिसेंबरला कार निकोबार बेटावरील त्सुनामी स्मारकाला भेट देतील. तिथे आदरांजली वाहतील आणि वॉल ऑफ लॉस्ट सोल्सवर मेणबत्ती प्रज्वलित करतील. ॲरोंग येथे आयटीआयचे उद्घाटन पंतप्रधान करतील तसेच अनेक पायाभूत सुविधांसाठी पायाभरणी ते करतील. एका सभेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत. उत्तरार्धात ते पोर्ट ब्लेअर येथील ‘शहीद कॉलम’ येथे आदरांजली वाहतील तसेच सेल्युलर जेलला भेट देतील.
हेही वाचा :- ‘बेधुंद’ महाविद्यालयीन जीवनाचे प्रतिबिंब, पुस्तक समीक्षा।
पोर्ट ब्लेअर येथे मरीना पार्क येथे नेताजींच्या पुतळ्याला ते पुष्पांजली वाहतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर तिरंगा फडकवण्याच्या 75 व्या वर्षानिमित्त पंतप्रधान नेताजी स्टेडिअम येथे नेताजींच्या सन्मानार्थ टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करतील. अंदमान आणि निकोबार बेटांसाठी नवीनतम शोध आणि स्टार्ट अप धोरण ते प्रकाशित करतील. 7 मेगावॅट सौर ऊर्जा सयंत्र आणि सौर गावाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. अनेक विकास प्रकल्पांसाठी ते पायाभरणी करतील. पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.