एम्समधल्या महत्वाच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
नवी दिल्ली, दि.३० – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली येथे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत, राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रासाठी पायाभरणी करण्यात आला. यामुळे वृद्धांना बहुविशेष आरोग्यसेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्राच्या सामान्य कक्षात 200 खाटा असतील.
याच कार्यक्रमात सफदरजंग रुग्णालयातील 555 खाटांच्या सुपर स्पेशॅलिटी विभागाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. सफदरजंग रुग्णालयातल्या 500 खाटांच्या नव्या आपत्कालीन विभागाचे आणि 300 खाटांच्या पॉवरग्रीड विश्रामसदनाचे लोकार्पण पंतप्रधानांनी केले. एम्स, अन्सारी नगर आणि ट्रॉमा सेंटर यांना जोडणाऱ्या बोगद्याचे लोकार्पणही पंतप्रधानांनी केले.
गेल्या चार वर्षात देशातील सार्वजनिक आरोग्यसेवेला नवी दिशा मिळाली आहे. गरीब आणि मध्यमवर्गाला चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप सरकार करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रातील सध्याच्या पायाभूत सुविधा सुधारण्यात येत असून द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय श्रेणीतल्या शहरांमध्ये चांगल्या आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
किफायतशीर आरोग्यसुविधा आणि आजारांना प्रतिबंध घालण्याला सरकारचे प्राधान्य आहे असे सांगून पंतप्रधानांनी राष्ट्रीय आरोग्य धोरणाचाही उल्लेख केला. या प्रयत्नांमध्ये ग्रामविकास मंत्रालय, पेयजल व स्वच्छता मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाचाही सहभाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
वर्ष 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटनाचे लक्ष्य भारताने ठेवले आहे, जे वर्ष 2030 या जागतिक लक्ष्याच्या आधी पूर्ण होण्याचे आहे. आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्र हे लक्ष्य पूर्ण करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.