मुंबईकरांकडून वसूल केलेले 21 लाख पोलिसानेच लाटले, 8 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या शिपायावर फसवणुकीचा गुन्हा

 

 

अनधिकृत फेरीवाले, विनामस्क फिरणारे लोक आणि इतर कारवाईदरम्यान दंड म्हणून वसूल केलेले तब्बल 21 लाख रुपये न्यायालयात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसात घडला आहे. संपूर्ण जगात ख्याती असलेल्या मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस शिपाई कारकुनाने हा कारनामा केला आहे. हा कारकून घाटकोपर पोलीस ठाण्यात नोकरीवर होता. त्याचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.

घाटकोपर पोलीस ठाण्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नागरिकांकडून लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला. अनधिकृत फेरीवाले, विनामस्क फिरणारे लोक आणि इतर कारवाईदरम्यान दंड म्हणून घाटकोपर पोलिसांनी दोन वर्षांत तब्बल 28 लाख रुपये दंड जमा केला. मात्र, पैशांपैकी फक्त 7 लाख रुपये न्यायालयात जमा करण्यात आले. उरलेले 21 लाख या पोलीस कारकुनाने स्वतःसाठी वापरले.

नागरिकांकडून दंड म्हणून घेतलेले पैसे पोलीस कारकुनाने स्वत: साठी वापरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांत खळबळ उडाली आहे. त्याहीपेक्षा ज्या कारकुनाने हे पैसे लाटले; त्याचा मागील 8 महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. ज्याने पैसे हडपले त्याचाच मृत्यू झाल्यामुळे आता ही रक्कम कोणाकडून वसूल करावी ? असा प्रश्न निर्माण झालाय.

देखरेख ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षकाचेही दुर्लक्ष
दरम्यान, ज्या पोलीस कारकुनाने पैसे हडपले त्याचाच मृत्यू झाल्याने घाटकोपर पोलीस ठाण्यात या मयत पोलीस शिपायावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरंतर दंडात्मक कारवाई करून जे पैसे जमा झाले आहेत. त्याची वेळोवेळी माहिती घेऊन वरिष्टपर्यंत देणं किंवा ते न्यायालयात व्यवस्थित जमा होतायत की नाही हे पाहणं पोलीस निरीक्षक (प्रशासन) यांची असते. मात्र संबंधित पोलीस निरीक्षकानेही याकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय. घाटकोपर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.