शंभर सूर्य नमस्कार घालून लोकमान्य टिळक यांना अभिवादन शैलेन्द्र रिसबुड यांचा आगळा उपक्रम

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ९९ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने डोंबिवलीच्या शैलेन्द्र रिसबुड यांनी शंभर सूर्य नमस्कार घालून त्यांना अभिवादन केले. मुंबईत सरदार गृह येथे गुरुवारी (१ ऑगस्ट) सकाळी रिसबुड यांनी हा उपक्रम केला.

लोकमान्य टिळक यांनी मुंबईतील सरदार गृह येथे अखेरचा श्वास घेतला. त्या ठिकाणी हा उपक्रम करावा, अशी संकल्पना केसरी’च्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना खरे यांनी मांडली होती. सरदार गृहात लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रिसबुड यांनी शंभर सूर्य नमस्कार घालून टिळक यांना अभिवादन केले.
‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा विजय असो’ या घोषणेत सूर्य नमस्कार उपक्रमाची सांगता झाली.

लोकमान्य टिळक यांना व्यायामाची आवड होती. शरीर सुदृढ करण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन जीवनात एक वर्ष विश्रांती घेतली होती, म्हणूनच लोकमान्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम करण्याचे ठरविले. सूर्यनमस्काराला जास्त जागा आणि इतर कोणतीही साधने लागत नाहीत. इतके असूनही तो सर्वांगीण व्यायाम समजला जातो. त्याच बरोबर तरुणामध्ये देशी व्यायामाचे महत्व रुजवावे, हा उद्देशही या मागे असल्याचे रिसबुड रिसबुड यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक यांनी मुंबईत केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या घटनेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रिसबुड यांनी लोकमान्यांना १, ५०० सूर्य नमस्कारांची मानवंदना दिली होती. २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत दररोज १२५ सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हाही रिसबुड यांनी ३०० सूर्य नमस्कारांचा उपक्रम सादर केला होता. एका दिवसात सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी १५० सूर्य नमस्कार त्यांनी घातले होते. या प्रमाणेच रिसबुड यांनी या आधी एकूण बारा वेळा सूर्य नमस्कारांचा हा उपक्रम केला असून १ ऑगस्ट रोजी केलेला हा तेरावा उपक्रम होता.

या आगळ्या उपक्रमासाठी रिसबुड यांचा
शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष राऊत, विधानसभा संघटक युगंधरा सांळेकर, उपविभाग प्रमुख सरिता तांबट, समन्वयक अपर्णा सावंत, सह समन्वयक अभिजित गुरव, शाखाप्रमुख संतोष शिंदे, स्मिता कदम आणि शिवसैनिक उपस्थित होते.
©️शेखर जोशी
२ ऑगस्ट २०१९

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email