डोंबिवली औद्योगिक विभागातील सुमारे ६५ गाळेधारकांना फायर एनओसी सादर करण्याची नोटीस
डोंबिवली दि.०२ – डोंबिवली औद्योगिक विभागातील सुमारे ६५ गाळेधारकांना औद्योगिक विभाग महामंडळाने दहा वर्षांनी नोटीस बजावली असून सात दिवसात फायर एनओसी सादर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल व पाणी व वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून फायर एनओसी आणणे ही जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाची असताना दहा वर्षानी आम्हाला नोटीस का असा सवाल व्यापारी करत आहेत. शिवसेनेचे या भागातील कार्यकर्ते राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात औद्योगिक विभागातील किती बांधकामाना फायर एनओसी आहे असा प्रश्न विचारला व त्या संदर्भात माहिती विचारली होती यामुळे खडबडून जागे झालेल्या औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास विलंब करुन मधल्या काळात गाळेधारकांना नोटीस बजावली असल्याचा आरोप व्यापारी करत आहेत.
हेही वाचा :- डोंबिवलीत धावतात बेकायदा रिक्षा, ट्रफिक जामला ‘ब्रेक’ लावणार कोण ?
एमआयडीसी तील प्लॉट पी-४-१ याचा विकासक ओम श्री गणेश दर्शन कन्स्ट्रक्शन कंपनी आहे.या कंपनीला एमआयडीसीने नोटीस बजावली आहे. फायर एनओसी सात दिवसात आणा अन्यथा फायर कायद्यानुसार वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशारा दिला आहे. सिटी मॉलमध्ये सुमारे ६५ गाळेधारक व्यवसाय करत असून या मध्ये विवाह समारंभाचे हॉल,वाहनांची शो रुम,राष्ट्रीय व सहकारी बॅक दुकाने,खाजगी कार्यालये यांचा समावेश आहे.या ठिकाणी रोज मोठया प्रमाणावर नागरिकांची ये जा असते.जर काही दुर्घटना घडली तर कोणत्याही प्रकारची प्रतिबंधक उपाययोजना नाही यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त होत आहे. सध्या आगी लागण्याचे प्रकार वाढले असून यामुळे एमआयडीसीला जाग आली असल्याचे व्यापारी बोलत आहेत.आणि यामुळेच एमआयडीसीने गाळेधारकांना नोटीस बजावली आहे यासदर्भात डोंबिवली औद्योगिक विभागातील अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी सुरेश शिंदे यांना विचारले असता औद्योगिक विभागातील बांधकामांना फायर एनओसी देण्याची जबाबदारी एमआयडीसीची असून आम्ही फक्त सेवा देण्याचे काम करतो असे सांगितले.