स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानाअंतर्गत नदी आणि नदीकाठ स्वच्छतेसाठी 150 कोटी रुपये मंजूर
नवी दिल्ली, दि.२९ – स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियानाची पाचवी कार्यकारी समिती बैठक नवी दिल्लीत काल झाली. यावेळी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात नदी आणि नदीकाठ स्वच्छ करण्यासाठी 150 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नमामि गंगे कार्यक्रमाअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत गंगा नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या नद्या, झरे आणि नाले यांचे संशोधन आणि विकास केला जाणार आहे. यामुळे नदीत सोडले जाणारे किंवा येऊन मिळणारे पाणी स्वच्छ असेल. या प्रकल्पाअंतर्गत नाल्यांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे आणि घाटांचा विकास केला जाणार आहे.
यात उत्तराखंडमधल्या छोट्या नद्यांसाठी 60 कोटी रुपये, उत्तर प्रदेशमधल्या घाट विकासासाठी 27.41 कोटी रुपये आणि पश्चिम बंगालमधल्या घाट तसेच स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी 8.58 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे.
याशिवाय गौमुख ते गंगा सागर या पट्टयातल्या गंगा नदीच्या सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करून त्याचा प्रबंध तयार करण्याच्या प्रस्तावालाही समितीने मंजुरी दिली आहे. यात पुरातत्व परंपरा, गंगा नदीशी जोडलेल्या सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणीय परंपरांचा अभ्यास केला जाईल.