मोदी-फडणवीस यांच्या ड्रिम प्रोजेक्टला दणके बसणार
Hits: 0
(म.विजय)
मुंबई दि.१२ :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामांचा धडाका सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे “ड्रिम प्रोजेक्ट’ असलेले बुलेट ट्रेनसारखे काही प्रकल्प कायमचे रद्द होण्याचे चिन्हे आहेत.या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने नंदूरबारच्या घोड्याच्या आंतरराष्ट्रीय जत्रेसाठी गुजरातच्या कंपनीला दिलेले ३२१ कोटींचे कंत्राट रद्द केले आहे.
फडणवीस सरकारने रेटलेल्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. फडणवीस सरकारकडून घोड्यांच्या आंतरराष्ट्रीय जत्रेच्या आयोजनाचे कंत्राट गुजरातमधील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले होते. २६ डिसेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अहमदाबादमधील लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबत करार केला. त्यामुळे नंदूरबारमध्ये होणाऱ्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलच्या व्यवस्थापनाचे कंत्राट कंपनीला देण्यात आले होते.
हेही वाचा :- Dombivali ; अनधिकृत बाधण्यात आलेल्या इन्फोसिस सिस्टीम प्रा.ली. इमारतीला सील ठोकले
याच कंपनीला रण उत्सव आणि कुंभ मेळ्याचेही कंत्राट मिळाले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पर्यटन विभागाने लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबतचा करार रद्द केला. याबद्दलचे आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काढले आहेत.लल्लूजी अँड सन्स कंपनीला कंत्राट देताना केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे म्हटले आहे. याशिवाय कंत्राटात आर्थिक अनियमितता देखील आढळून आल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.