महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: युती नको अन् आघाडीही; ‘नोटा’ला वाढलेली मतं मनसैनिकांची?
मुंबई दि.२५ – लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने एनडीएच्या पारड्यात कौल देऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. राज्यातही शिवसेना-भाजपाला प्रचंड प्रमाणात यश मिळालं. मागील निवडणुकीत शिवसेना भाजपाचे 41 खासदार होते तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी हातकणंगलेमधून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाने आपल्या जागा राखल्या आहेत. 41 ठिकाणी युतीचे खासदार निवडून आले. मतांचे गणित पाहिले तर राज्यात भाजपाला 27.6 टक्के( 1 कोटी 49 लाखांहून अधिक) मते मिळाली. शिवसेनेला 23.3 टक्के( 1 कोटी 25 लाख 89 हजारांहून अधिक) मते मिळाली. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला 16.3 टक्के(87 लाख 92 हजारांहून अधिक) तर राष्ट्रवादीला 15.5 टक्के(83 लाख 87 हजारांहून अधिक) मतं मिळाली. इतरांना 14.6 टक्के(78 लाख 65 हजारांहून अधिक) आणि नोटाला( 4 लाख 88 हजारांहून अधिक) मतदान झाले आहे. त्यामुळे नेमकं राज्यातील नोटांच्या मतदानात झालेली वाढ का झाली असावी अशा चर्चा आता सुरु आहेत.
मनसेचे प्रभाव असलेल्या मतदारासंघात नोटांना 10 हजारांहून अधिक मतदान झालं आहे. निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 10 सभा घेऊन भाजपाविरोधी प्रचार केला. राज ठाकरे यांच्या मतांचा फायदा आघाडीला होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मनसेची मतं विभागली गेली. थेट काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करा असं आवाहन राज यांनी केलं नसलं तरी मनसेच्या मतदारांनी काही प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यात मतदान केलं असावं हे नाकारता येत नाही. पण मनसेचे मतदार हे मुळचे शिवसैनिक आहे. हिंदूत्वाच्या बाजूने असलेली मते काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाली नाहीत. 2014 साली मोदी लाटेतही मनसेच्या उमेदवारांना हजारोंच्या संख्येत मतं मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत ही मते विभागली गेली. काही प्रमाणात ही मते शिवसेना-भाजपाच्या पारड्यात गेली. काही प्रमाणात आघाडीच्या पारड्यात गेली. मात्र ज्यांना या दोघांनाही निवडून द्यायचं नाही अशा लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याचं दिसून आलं.