कल्याणचा लँडमार्क झाला इतिहासजमा

कल्याण दि.२३ – धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल पाडण्याची मोहीम रविवारी फत्ते करण्यात आली. या कामासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. प्रत्यक्षात दुपारी २.३५ वाजताच हे ऑपरेशन फत्ते करण्यात आले. दुपारी २.४० वाजता कल्याणहून वाराणसी महानगरी एक्स्प्रेस मुंबईला रवाना करण्यात आली. १९१४ साली बांधण्यात आलेल्या आणि आता इतिहासदरबारी नोंद झालेल्या या पुलाची यापुढे नाममात्र आठवण राहणार आहे. मेगाब्लॉकमध्ये कल्याण-डोंबिवलीदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने त्याचा ताण रस्ता वाहतुकीवर पडण्याची शक्यता गृहीत धरून सकाळपासून वाहतूक व शहर पोलीस, केडीएमटी आणि एसटी महामंडळाची यंत्रणा सज्ज होती. शिसे आणि लोखंडमिश्रित पत्रीपुलाचे वजन १२० टन होते. पुलामध्ये ६० टनाचे दोन गर्डर होते. ते काढण्यासाठी पूर्वेकडील बाजूला ६०० टन क्षमतेची क्राउल क्रेन, तर पश्चिमेकडील बाजूला ४०० टन क्षमतेच्या क्राउल क्रेनचा वापर करण्यात आला. या क्रेनव्यतिरिक्त २५० टन आणि रेल्वेची १४० टनाची क्रेन आणण्यात आली होती.

हेही वाचा :- २५ तारखेला डोंबिवलीत श्वानांचा फॅशन शो

मेगाब्लॉकदरम्यान कल्याण-डोंबिवलीदरम्यानची लोकलसेवा बंद करून अन्य १४० लोकलफेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या. काही लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले होते. सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता, तर कल्याणहून सकाळी ९ वाजून ९ मिनिटांची लोकल मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. मेगाब्लॉकला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ होणार होता; परंतु सकाळी ९ वाजतापासूनच डोंबिवलीला आलेल्या लोकल कल्याणच्या दिशेने रवाना केल्या जात नव्हत्या. त्या डोंबिवली स्थानकातच रद्द केल्या जात होत्या. यामुळे कल्याणकडे जाणा-या प्रवाशांचे मेगाब्लॉकच्या आधीच हाल झाले. यासंदर्भात कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने प्रवासी गोंधळले होते. मुख्य पाडकाम करण्याआधी पत्रीपुलाच्या खालून जाणाºया मध्य रेल्वेच्या २५ हजार व्होल्टच्या वाहिन्या उतरवण्याचे काम करण्यात आले. पत्रीपुलाचे दोन्ही गर्डर बाजूला केल्यानंतर पुलाखालील २५ हजार व्होल्टच्या वाहिन्या पुन्हा जोडण्याचे काम करण्यात आले. दुपारी २.३५ वाजता मोहीम पूर्ण झाल्यानंतर दुपारी २.४० वाजता कल्याणहून पहिली मेल-एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली.

मुंबईकरांना मनस्ताप

पत्री पुलाच्या पाडकामामुळे मुंबईकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पाडकामामुळे लोकलसह मेल-एक्सप्रेस ठप्प असल्याने स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. मध्य रेल्वेकडून नियोजित वेळेआधी लोकल सेवा सुरू केल्याचा दावा होत असला तरी प्रत्यक्षात सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकलची प्रतीक्षा कायम होती. डोंबिवलीहून येणाºया लोकल गर्दीने भरून येत असल्याने मुलुंड, नाहूर, घाटकोपरसह कुर्ला, सायन आणि दादर स्थानकातील प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email