कल्याण ; फेरीवाला अतिक्रमण पथकातील कर्मचार्यांना शिवीगाळ व मारहाण…
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०७ – कल्याण-डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी दिवसागणिक वाढत असून कारवाई दरम्यान एका फेरीवाल्याने फेरीवाला अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना काल कल्याण स्कॉय वॉकजवळ घडली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलीसांनी गफूर नावाच्या फेरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका डोंबिवलीकर तरूणाचा बळी
काल सकाळी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरतील फेरीवाल्यांवर कारवाई साठी फेरीवाला अतिक्रमण पथकातील दामोदर साळवे, मिलिंद गायकवाड, कैलाश ढालवाले, संदीप म्हात्रे आदी कर्मचारी गेले. या ठिकणी रस्ते व फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना साडे सात वाजण्याच्या सुमारास बोरगावकर कॉम्प्लेक्सच्या गेट समोरील स्कायवॉकच्या शिडीजवळ अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना एका भाजीवाल्याने कारवाईस विरोध करत शिवीगाळ करणे सुरु केले. तसेच पथकातील कर्मचाऱ्यांचा धक्काबुक्की करत साळवे यांच्या डोक्यात कोथिंबीरचे कारेट मारत धमकी दिली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी गफूर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.