महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन आज जगभरात साजरा केला जात आहे. यावर्षी देहरादूनच्या वन संशोधन संस्थेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रपती भवनात आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. 500 हून अधिक अधिकारी, राष्ट्रपती भवनातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच राष्ट्रपती भवन परिसरातील रहिवासी यात सहभागी झाले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुरीनामच्या दौऱ्यावर असून, ते तिथल्या स्थानिक वेळेनुसार सात वाजता सुरीनामचे राष्ट्रपती आणि अन्य मान्यवरांसह परामारीबो येथे आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी झाले.
आरोग्य आणि सुखासाठी योगाभ्यास ही सर्वांगिण पद्धती असून, त्याला शारिरीक, मानसिक आणि अध्यात्मिक आयाम आहे, असे उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभात सहभागी झालेल्या समुदायाला संबोधित करत होते. योग धारणेचे प्राचीन विज्ञान ही भारताने आधुनिक जगाला दिलेली अमुल्य भेट आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंडमधील देहराडून येथे वन संशोधन संस्थेच्या संकुलात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सुमारे 50 हजार उत्साही योगाभ्यास स्वयंसेवकांसह योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. योगाभ्यास करणाऱ्या जगातील उत्साही लोकांना स्पष्ट संदेश देतांना पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जगाने योगाभ्यासाला आपलसं केले असून, दरवर्षी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभातून याचे दर्शन घडते. उत्तम आरोग्य आणि सुखाच्या शोधात असलेल्यांसाठी योग दिन ही सर्वात मोठी लोक चळवळ बनली आहे, असे ते म्हणाले. योगाभ्यासाच्या क्षमतेबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, लोकांना तसेच समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर योगाभ्यास हे उत्तर आहे. योगाभ्यासामुळे ताणतणाव विरहीत शांत आणि समाधानी जीवन जगता येऊ शकेल. भेदभाव न करता योगाभ्यास सर्वांना एकत्र आणतो, वैरभावाच्या जागी एकजुटीची भावना निर्माण करतो. वेदना वाढण्याऐवजी योगामुळे आराम मिळतो, असे ही पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईत राजभवन येथील सूर्योदय गॅलरी येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त कैवल्यधाम योग संस्थेने आयोजित केलेल्या विशेष सत्रात महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव सहभागी झाले होते.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही मरीन ड्राईव्ह आणि मुंबई विद्यापीठात योगसाधना केली. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांबरोबर योगासने केली. परिपूर्ण आणि निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने योगाभ्यास करायला हवा असे ते म्हणाले . जगभरात आज अनेकजण योगाभ्यासाचे प्रशिक्षण घेताना मी पाहिले आहे आणि अजूनही त्याचा प्रसार होत आहे. ही भारताची ताकद असून योग ही भारताने जगाला दिलेली भेट आहे. असे त्यांनी मुंबई विद्यापीठात योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना सांगितले. जेव्हा नरेंद्र पंतप्रधान बनले, तेव्हा त्यांनी संयुक्त राष्ट्रासमोर योगाभ्यासाला प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडला होता. योगाभ्यास हा विना-खर्चिक, कुठलीही साधने न लागणारा मानवाच्या आरोग्यासाठी उत्तम असा व्यायाम असल्यामुळे संयुक्त राष्ट्राने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करायला मान्यता दिली असे ते म्हणाले. आज १९० हून अधिक देश योगदिन साजरा करत आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टने हार्टफुलनेस आणि पतंजली योग समितीच्या सहकार्याने गेटवे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी ध्यानधारणा सत्राचे आयोजन केले होते.
मन, शरीर, भावना आणि ऊर्जे दरम्यान समन्वय प्राप्त करुन निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी पश्चिमी नौदल कमांडने ‘फिटनेस ते वेलनेस’ या नवीन तत्वज्ञानासह योगाची जीवनशैली स्वीकारले आहे. पश्चिम नौदल कमांडच्या मुंबई, कर्नाटक, गोवा आणि गुजरात स्थित कार्यालयांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. कमांडच्या औद्योगिक युनिटमधील जवानांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पश्चिम नौदल कमांडचे 15 हजारहून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.
मुंबईतल्या नेहरु सायन्स सेंटरनेही ‘हिस्ट्री ऑफ योगा : बॅलन्स अँड अलाईन्मेंट’ हे प्रदर्शन आयोजित करुन चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या प्रदर्शनात प्राचीन काळापासून भारतात प्रचलित योग पद्धतीचे ऐतिहासिक संदर्भाचे दर्शन घडते. अयंगार योगाश्रय यांच्या नेतृत्वाखाली योगाभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हिस्ट्री ऑफ योगा हा माहितीपट दाखवण्यात आला.
टपाल विभागानेही यानिमित्त ‘सूर्य नमस्कारा’वरील विशेष टपाल पाकीटाचे प्रकाशन केले.
मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र संचालनालयाचे एनसीसी आणि आयआयटी मुंबईने योग दिन साजरा केला.
नागपूर महानगरपालिकेनेही योगासने सादर करुन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रत्येकाने योगसाधनेचे महत्व जाणून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतल्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने विविध योगासने, मुद्रा आणि प्राणायाम करुन सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. यावेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या आर्थिक सल्लागार उषा सुरेश आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी हे उपस्थित होते.
बोरीवलीच्या विविध भारती स्टुडियोतही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते. प्रसिद्ध चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री सोनाली शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसने, सूर्यनमस्कार आणि ओमकार साधना करण्यात आली.
योग दिन कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईतल्या पत्र सूचना कार्यालयातही योगाभ्यासाच्या मुलभूत माहितीवरील चर्चासत्रात पत्र सूचना कार्यालय, मुंबईचे उपसंचालक, आयआयएस, राहुल तिडके यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर योगाटेकचे योगाचार्य विश्वनाथ यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी योगाभ्यास सत्र घेतले.