ठाण्याच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा
Hits: 0
नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ठाणेकर माधुरीका पाटकर हिने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुवर्ण पदकाची कमाई करत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात मधुरिका पाटकर आणि श्रीजा अकुला यांनी सुतीर्थ मुखर्जी आणि अहीका मुखर्जी यांना पराभूत करत हे यश खेचून आणले. तर सांघिक खेळात मधुरिका पाटकरने सिक्का सुवालविरुद्ध ११-७, ११-४, ११-३ असा जबरदस्त विजय मिळवून आपला वेगळा दबदबा निर्माण केला. विशेष म्हणजे, आजवर माधुरीका दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सातस्पर्धा खेळली असून तिने सातहीवेळा सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. माधुरीका पाटकरच्या या भरघोस कामगिरी बाबत तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसर्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदकांची भरीव कामगिरी केली. बुधवारी भारताने तब्बल २९ पदकांची कमाई केली तर आतापर्यंत ३२ सुवर्ण, २६ रौप्य आणि १३ कांस्यपदकांची कमाई केली आहे. तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी पुरुष व महिला दुहेरीच्या दोन्ही गटात सुवर्ण व रौप्यपदके जिंकली. हरमीत देसाई आणि अँथनी अमलराजने पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये असलेल्या सानिल आणि सुधांशू यांचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. हरमीत आणि अमलराज या जोडीने सानिल आणि सुधांशुचा ८-११, ११-७, ११-७, ११–५, ८-११, १२-१० असा पराभव केला. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात मधुरिका पाटकर आणि श्रीजा अकुला यांनी सुतीर्थ मुखर्जी आणि अहीका मुखर्जी यांना २-११, ११-८, ११-८, ११-६, ५-११, ११-५ असे पराभूत केले. श्रीलंकेच्या विशाका मधुरंगी आणि हंसिनी पुईलिमा आणि बांगलादेशच्या सोनम सोमा आणि सदी रमन मौ यांच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत हरमीतने सुतीर्थ मुखर्जी यांच्यासह अमलराज व अहीकाला ११-६, ९-११ ११-६, ११-६, ११-८ असे पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळला पराभूत केले तेव्हा अहीका मुखर्जीने नबीता श्रेष्ठला पराभूत करून भारताला १-० ची आघाडी मिळवून दिली. मधुरिका पाटकरने सिक्का सुवालविरुद्ध ११-७, ११-४, ११-३ असा जबरदस्त विजय मिळवून आपला वेगळा दबदबा निर्माण केला आणि शेवटी श्रीजाने एलिना महर्जनचा असा पराभव केला.
मधुरिकाने खेळात, सरावात सातत्य राखत आपल्या यशाचा आलेख कायम उंचच उंच राखला आहे. माधुरीकाने याआधी सातवेळा दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळली असून तिने सातहीवेळा सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. यात २०१० साली ४, २०१६ साली एक तर २०१९ साली २ अशी एकूण सात सुवर्णपदकांची कमाई केली आहे. तर, गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येदेखील मधुरिका पाटकरन सुवर्ण पदकाची मोहर उमटवली होती. ठाणेकर मधुरिका पाटकरच्या शिदोरीत तब्बल सव्वाशेहून अधिक पदकं असून यातील सुमारे पंधरा पदक हि तिने राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी कमावली आहेत. १३ वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप मिळवलेल्या मधुरिकाला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित केले असून युथ नॅशनल चॅम्पियनशिप, ठाणे क्रीडा पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, ठाणे गौरव पुरास्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.