बालनगीर आणि बिचुपली दरम्यान 15 किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन

नवी दिल्ली, दि.१६ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील बालनगीरला भेट दिली. यावेळी त्यांनी 1500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. सकाळी त्यांचे रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर आगमन झाले आणि त्यानंतर ते बालनगीरसाठी रवाना झाले. झारसुगुडा येथील मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्क त्यांनी राष्ट्राला समर्पित केला. या मल्डिमोडल लॉजिस्टिक पार्कमुळे झारसुगुडा हे प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र बनेल. रेल्वे प्रकल्पांना चालना देण्यासाठी त्यांनी 115 कोटी रुपये खर्चाच्या बालनगीर-बिचुपली रेल्वे मार्गाचे उद्‌घाटन केले. ओडिशाच्या जनतेप्रती आपली वचनबद्धता दर्शवताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यात हा त्यांचा तिसरा ओदिशा दौरा आहे. बालनगीर रेल्वे यार्डात जमलेल्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, पूर्व भारत आणि ओदिशाच्या विकासासाठी सरकार नियमितपणे प्रयत्न करत आहे. बालनगीर येथे अनेक विकास प्रकल्पांचा करण्यात आलेला शुभारंभ हे या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे ते म्हणाले.

नागवली नदीवरचा पूल, बारपाली-डुंगरीपाली आणि बालनगीर-देवगांव दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि झारसुगुडा-विझिनगरम आणि संबलपूर-अंगुलचा 813 कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. ओदिशातील सोनेपूर येथील केंद्रीय विद्यालयाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. या विद्यालयासाठी 15.81 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संपर्क आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की शिक्षणामुळे मनुष्यबळ विकास होतो. मात्र संपर्क व्यवस्थेमुळे अशा संसाधनांचे संधीत परिवर्तन होते. सहा रेल्वे प्रकल्पांचे उद्‌घाटन हे संपर्क वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. यामुळे लोकांना येण्याजाण्याची सुविधा उपलब्‍ध होईल तसेच उद्योग क्षेत्राला खनिजे लवकर मिळतील आणि शेतकऱ्यांना आपला शेतमाल लांबच्या बाजारपेठांमध्ये नेता येईल आणि यापुढे ओदिशातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल. संस्कृती आणि वारशाचे जतन करण्याप्रती आपली वचनबद्धता स्पष्ट करत पंतप्रधान म्हणाले की यामुळे सांस्कृतिक संबंध अधिक बळकट होतील आणि राज्यातील पर्यटन संधीत वाढ होईल. गंधहरदी (बौध) येथील नीलमाधव आणि सिद्धेश्वर मंदिराच्या नुतनीकरण आणि जीर्णोद्धाराबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मोदींनी बालनगीर आणि असुरगड किल्ल्यातील राणीपूर झांरियल स्मारक समूहाच्या नुतनीकरण आणि जीर्णोद्धार कामांचे उद्‌घाटन केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email