महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे निधन
नवी दिल्ली दि.२२ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गुरुदास कामत काल दिल्लीत अहमद पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. पटेल यांना भेटून सायंकाळी ते हॉटेलमध्ये मुक्कामाला गेले. मध्यरात्री त्यांना हार्ट अटॅक आला.
हेही वाचा :- डोंबिवलीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली
तेथून त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास कामत यांचं वर्चस्व होतं. गुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. मुंबईत चेंबूर येथे त्यांचं बराच काळ वास्तव्य होतं. पेशाने वकील असलेले कामत यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉची पदवी मिळवली. २००९ ते २०११ या कालखंडातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये गुरुदास कामत यांनी गृहमंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचीही अतिरिक्त जबाबदारी होती.