नोकरी सोडून पोलिस अधिकारी बनला खासदार, जुने सहकारी दिसताच आदराने ठोकला सॅल्यूट…

हैदराबाद- नेत्यांना सलाम करण्यापासून ते स्वतः खासदार होऊन सलाम स्विकारण्यापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोत हे नवनिर्वाचित खासदार आपल्या जुन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट करताना दिसत आहे. फोटो आंध्रप्रदेशचे पोलिस निरीक्षक गोरंतला माधव यांचा आहे. ते यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अनंतपूर जिल्ह्यातील हिंदापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. फोटोत खासदार माधव आणि त्यांचे जुने वरिष्ठ गुन्हे शाखेचे उपाधीक्षक मेहबूब बाशा एकमेकांना पाहून आनंदाने सॅल्यूट करताना दिसत आहेत. यावेळी बाशा यांच्यासोबत इतर पोलिसही उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.

गोरंतला माधव यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून तेलुगू देसम पक्षाचे विद्यमान खासदार क्रिस्तप्पा निम्मला यांचा 1 लाख 40 हजार 748 मतांनी पराभव केला. हा फोटो मतमोजणी सुरू असताना एका मतदान केंद्राच्या बाहेर घेण्यात आला होता. माध्यमांशी बोलताना माजी पोलिस अधिकारी आणि नवनिर्वाचित खासदार माधव म्हणाले-“मी प्रथम माझ्या जुन्या वरिष्ठांना सॅल्यूट केले. मी त्यांचा आदर करतो. तो सॅल्यूट आमच्या दोघांमधील परस्पर सामंज्यस्यातून केला होता.” गोरंतला माधव आणि टीडीपीच्या एका खासदारांमध्ये 2018 मध्ये हिंसाचारप्रकरणावरुन झालेल्या वादानंतर ते प्रथम चर्चेत आले होते. टीडीपी खासदारांनी पोलिसांवर आर्वाच्च आणि गलिच्छ भाषेत टीपण्णी केली होती. तेव्हा माधव यांनी संबंधित खासदाराला चांगलेच सुनावत, असे बोलणाऱ्याची जीभ छाटू असे म्हटले होते. त्यानंतर माधव यांनी पोलिस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि राजकीय आखाड्यात उडी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email