नैतिक आणि जबाबदार नेतृत्व ही काळाची गरज : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.०६ – नैतिक आणि जबाबदार नेतृत्व ही काळाची गरज असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. सार्वजनिक जीवनात येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी वास्तव जाणून घेऊन सामान्य माणसाशी संवाद साधणे आणि युवकांच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेणं महत्वाचे आहे असे ते म्हणाले. ते आज महाराष्ट्रातल्या ठाणे इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ लिडरशीपच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी स्वच्छ सरकार, स्वच्छ दूरदृष्टी आणि समर्पित नेतृत्व आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.
हेही वाचा :- सर्वसमावेशक, सर्वंकष आणि शाश्वत उच्च आर्थिक विकासासाठी सरकार कटिबद्ध – धर्मेंद्र प्रधान
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून ही मूल्ये बिंबवायला हवीत असे आवाहन त्यांनी विद्यापीठं, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांना केली. विद्यार्थ्यांना संसदीय व्यवस्थेची ओळख करुन देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पुरवण्यासाठी प्रशासन व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगात सध्या भेडसावणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवकांनी तंत्रज्ञान शिकून घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. जनादेशाचा तसेच इतरांच्या मताचा आदर करायला हवा अशी सूचना त्यांनी केली. राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.