ज्ञान आणि सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.०६ – ज्ञान आणि सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन करण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. काल पोर्ट ब्लेअर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान संस्थेत उपस्थितांना ते संबोधित करत होते. वेगाने बदलणाऱ्या ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेच्या नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेने स्वत:चा नव्याने शोध घ्यायला हवा, असे ते म्हणाले.
खऱ्या शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळायला हवी असे ते म्हणाले. शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच स्वयंरोजगाराच्या कौशल्यावरही समान भर द्यायला हवा. उच्च शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे केवळ शैक्षणिक गुणवत्ता नको, तर प्रामाणिकपणाबरोबरच नैतिक मूल्ये ही असायला हवीत यावर त्यांनी भर दिला. बालवयातच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे बनण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सर्जनशील, नाविन्यपूर्ण आणि नवीन कल्पनांचा शोध घेण्याची सूचना केली.