डोंबिवली ; पार्किंग प्लाझातील रिक्षा स्टँन्डवरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली

डोंबिवली दि.०६ – शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पार्किंग प्लाझाच्या कॉम्पलेक्समध्ये रिक्षा स्टॅन्ड हलविण्यासाठी डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे आग्रही आहेत. तसे आदेशच त्यांनी संबधित यंत्रणाला दिले होते. मात्र चव्हाणांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचेच दिसून येत आहे. बेसमेंटमध्ये रिक्षा हलवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने दुसर्‍यांदा स्थगित ठेवला. त्यामुळे राज्यमंत्री चव्हाणांना शिवसेनेकडून शह दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :- ‘डोंबिवली रिटर्न’ : अपेक्षा वाढवून पूर्ण करण्यात कमी पडलेला सिनेमा

डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक हा सर्वात महत्वाचा चौक म्हणूनच ओळखला जातो. इथल्या चारही रस्त्यांवर रिक्षा आणि बस स्टॅन्ड असल्याने या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री चव्हाण यांनी पालिका अधिकारी आरटीओ वाहतूक पोलीस यांच्यासह पाहणी दौरा केला होता. या परिसरातील अनेक ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड असल्याने हे रिक्षा स्टॅन्ड एकाच ठिकाणी हलविले गेल्या वाहतूक कोंडी कमी होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी हे रिक्षा स्टॅन्ड पाटकर प्लाझा पार्किंगच्या बेसमेंटमध्ये हलविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार पालिकेने बॅरिगेट्स खरेदीचा प्रस्ताव तयार करून शनिवारच्या स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र दुसर्‍यांचा हा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. सभापती दिपेश म्हात्रे यांनी तो स्थगित ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे राज्यमंत्री चव्हाण यांच्या आदेशाला खीळ बसल्याचे दिसून येत आहे. या जागेचे आरक्षण हे पार्किंगसाठी आहे. त्या जागेवर रिक्षा स्टॅन्ड केल्यास तसा आरक्षणात बदल करावा लागेल. आरक्षणात बदल करायचा असल्यास महासभेची मान्यता घ्यावी लागेल. असे स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

काय आहे राजकारण ?

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीतून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढले होते. भाजपकडून रविंद्र चव्हाण तर शिवसेनेकडून दिपेश म्हात्रे हे रिंगणात होते. त्यामुळे चव्हाण आणि म्हात्रे यांच्यामध्ये चांगलीच लढत झाली होती. चव्हाण यांना 83872 तर म्हात्रे यांना 37647 मते मिळाली होती. त्यामुळे चव्हाण आणि म्हात्रे हे एकमेकांचे राजकीय स्पर्धकही आहेत. त्यामुळेच पार्किंग प्लाझाचा प्रस्ताव लटकून पडल्याचे बोलले जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email