डोंबिवलीत धावतात बेकायदा रिक्षा, ट्रफिक जामला ‘ब्रेक’ लावणार कोण ?
डोंबिवली दि.०१ – फूटपाथवर आणि रस्त्यांवर बसणारे फेरीवाले यामुळे लाखो डोंबिवलीकर हैराण झाले असतानाच त्यात आता बेकायदा रिक्षांचीही भर पडली आहे. शहरात सुमारे पाचशे बेकायदा रिक्षा धावत असून त्यांच्याकडे ना परवाने, ना बॅच. तरीही सब कुछ चलता है.. म्हणत हे रिक्षावाले राजरोसपणे धंदा करीत आहेत. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर पाच महिन्यांत केलेल्या कारवाईत 15 लाखांचा दंड वसूल केला असला तरी ट्रफिक जामला ‘ब्रेक’ लावणार तरी कोण, असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे.
हेही वाचा :- आईची बाजू घेतो म्हणून बापानेच आपल्या अल्पवयीन मुलाला…..
डोंबिवलीत आठ ते दहा हजार रिक्षा असून चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे नागरिकच नाही तर वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत. शहरात रिक्षाचालकांच्या विविध राजकीय पक्षांच्या संघटना आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर राजकीय पक्षाचे नेते पोलीस खात्यावर दबाव आणून कारवाई करण्यापासून रोखतात. यामुळे रिक्षाचालकांना शिस्त कशी लावणार, असा सवाल पोलीस करत आहेत. बाजीप्रभू चौक, पाटकर रोड, केळकर रोड, इंदिरा चौक फत्ते अली रोड, अशा विविध रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत रिक्षा तळ करण्यात आले आहेत.
हेही वाचा :- कल्याणात मद्यपीचा रुग्णालयात धिंगाणा
इंदिरा चौकात पाटकर रोड व बाजीप्रभू चौक येथून मानपाडा रोडला जाणाऱया रिक्षा एकाच दिशेने वेगाने धावतात. वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, इतर नागरिकांनी रस्ता क्रॉस करताना जीव मुठीत घेऊनच पार करावा लागतो. वाहतूक पोलिसांना विचारले असता ‘एक दिशा’ करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. डोंबिवली वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना विचारले असता त्यानी रिक्षाचालक बेशिस्त असल्याचे मान्य केले. सुमारे 20 टक्के रिक्षा विनापरवाना व गणवेश नसलेले वाहक असल्याचे त्यांनी सांगितले.