डोंबिवली ; शिवसेनेच्या मनातला ‘राम’ खोटा …..
डोंबिवली दि.०४ – काही दिवसानंतर हे जनतेला दिसून येईल की शिवसेनेच्या मनातला ‘राम’ खोटा आहे. श्री राम हे सर्वांचे आहेत. पण शिवसेनेची श्री रामाबद्दलची श्रद्धा स्वार्थासाठी आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात पुन्हा आघाडी सरकारची सत्ता येणार असे विधान राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी डोंबिवलीत केले. पाटीदार भवन येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, प्रवक्ते महेश तपासे,कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. वंडार पाटील, नगरसेवक बाबाजी पाटील, सिराज डोंगरे, सारिका गायकवाड, सुरेश जोशी, प्रल्हाद भिलारे, दत्ता वझे, जानू वाघमारे, राजू शिंदे, समीर भोईर, विनया पाटील, पूजा पाटील यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :- आता सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या होणार
राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात शिवसेना- भाजपावर जोरदार टीका केली.मोदी सरकार हे फेकू सरकार आहे. कोणत्याही खात्यात १५ लाख सोडा , १५ रुपये तरी आले का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६५०० कोटी रुपये देणार म्हंटले होते , त्या आश्वासनच काय झालं. महागाई कमी झाली का ! इंधन दरवाढ कमी झाली का ? याचाही विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. आता ही हवा कमी झाली आहे.पुन्हा आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे पक्ष बांधणीसाठी विचार करावा, जेणे करून बळकटी येईल आणि आपण महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत आपला ठसा उमटवू शकू. लोकनेते वंडार पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करावे , सुधीर पाटील यांनी नेतृत्व करावे आणि पक्षाला बळकटी देऊन कार्यकर्त्यांना आत्मविश्वास निर्माण करावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात राज्यात मोठी आघाडी घेईल, त्यासाठी युवकांनी सज्ज व्हा. आंदोलने, मोर्चे काढून सामाजिक प्रश्नांनाना वाचा फोडा. प्रसंगी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवा असेही यावेळी नाईक यांनी यावेळी सांगितले.