Dombivli ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, टँकर माफियाकडून दूषित पाणी पुरवठा

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भीषण पाणीटंचाई आहे. अनेक भागांत पालिकेचे पाणी अतिशय कमी दाबाने पुरविले जात असल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. एप्रिल-मे महिन्यात नव्हे तर आता जून महिन्यातही टँकरची मागणी वाढल्यामुळे टँकर माफियांकडून नागरिकांची वारेमाप लूट करताना अशुद्ध दूषित पाणी नागरिकांच्या घशात ओतले जात आहे. मात्र पालिका प्रशासनाचा यावर कोणत्याही प्रकारे अंकुश नसल्यामुळे टँकर चालकाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. डबक्यात साचलेले पाणी मोटार लावून टँकरमध्ये भरले जात असून हे पाणी नागरिकांना वापरण्यासाठी पुरविले जात असतानाच आता तर डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात दूषित पाण्याचे स्रोत आढळून आले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवलीला पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातून जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील पाणी दोन पाइप जोडलेल्या सांध्यावर आणि व्हॉल्ववरून प्रेशरमुळे बाहेर पडत असून आजूबाजूचे नागरिक गाड्या धुण्यासाठी, आंघोळीसाठी या पाण्याचा वापर करतात. ठिकठिकाणी बाहेर पडणारे हे पाणी एका खोलगट जागी साचून या पाण्याचे डबके तयार झाले आहे. या दूषित पाण्याचा नागरिकांकडून वापर होऊ नये यासाठी पालिकेने मोटार लावून हे पाणी सांडपाण्याच्या पाईपमध्ये सोडले आहे. मात्र तरीही डबक्यात सतत पाणी साचत असून आजूबाजूचा कचरा या डबक्यात फेकला जातो. बाजूला असणाऱ्या वस्तीतील मुले याच पाण्यात बुचकळण्याचा आनंद लुटतात. मात्र आता या पाण्यावर टँकरचालकांच्या नजरा गेल्या आहेत.

मागील महिनाभरापासून टँकर विक्रेते या डबक्यातील दूषित पाणी मोटार लावून टँकरमध्ये भरत असून नागरिकांना या पाण्याची विक्री करताना आढळून येत आहेत. टँकर चालकांचा पाठलाग केला असता हे टँकर डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या एका ठिकाणी पाण्याचे स्रोत असलेल्या डबक्यातून पाणी उचलत असल्याचे आढळून आले. या निमित्ताने नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ समोर आला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे टँकरच्या पाण्याकडे नागरिकांच्या नजरा लागलेल्या असतात. टँकर येणार असल्याचे कळताच हातातील कामे बाजूला करत नागरिक टँकरच्या पाण्यासाठी रांगा लावतात. चांगले पाणी पिण्यासाठी मिळेल म्हणून या टँकरसाठी दोन ते तीन हजार रुपये मोजले जातात. मात्र प्रत्यक्षात इतके पैसे मोजूनही नागरिकांना दूषित पाण्यातून होणारे आजार विकले जात असल्यामुळे या गंभीर गोष्टीकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे

रोगराईचाही विळखा : साचून राहिलेल्या पाण्याच्या डबक्यांमुळे डासांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. जागोजागी वाढलेली गाजरगवत, ओपन प्लेसेसवर वाढलेली झाडे, झुडुपे यामुळे डासांना लपायला आयतीच जागा मिळत असून डासांच्या चावण्यामुळे रोगराई पसरण्यातही वाढ होत आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email