Dombivali ; सेनेच्या युवराजांसाठी खड्डेभरणी; करदात्यांना किंमत नाही?

श्रीराम कांदु

डोंबिवली दि.२० :- गणपती बाप्पांसाठीही न बुजवलेले डोंबिवलीतले खड्डे आदित्य ठाकरेंसाठी तातडीने बुजवण्यात आल्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे. महिन्याभरापासून कल्याण-डोंबिवलीकर खड्ड्यांमुळे अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. मात्र, पावसाचे कारण पुढे करून महापालिका हे खड्डे भरण्यास टाळाटाळ करीत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी कल्याण आणि डोंबिवलीत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा असल्याने, सत्ताधारी पक्षाच्या युवाराजांना कोणत्याही प्रकारे रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी केडीएमसी, एमएसआरडीसी, एमआयडीसी आदी शासकीय यंत्रणा यात्रेच्या मार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाला जुंपली होती. घाईघाईत का होईना खड्डे भरण्यात आले. त्याबद्दल या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक आणि स्थानिक युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मनापासून नक्कीच आभार मानतील. परंतु, आदित्य ठाकरे आले नसते, तर खड्डे भरले नसते का? आणि इतर ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत प्रशासनाची सापत्न वागणूक का? इथे राहणाऱ्या नागरिकांची, करदात्यांची शासनाच्या लेखी कोणतीच किंमत नाही का? असे अनेक प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा १४ हजार रुपये बोनस मिळणार

सेलिब्रिटिंनी देखील वर्तवली नाराजी

रस्त्यावरील खड्डयांमुळे कल्याण डोंबिवलीकर कमालीचे हैराण झाले आहेत. शहरातील एकही रस्ता खड्डामुक्त नाही. प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकासह नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीत कार्यक्रमानिमित्त आलेले पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनीही डोंबिलीतील खड्ड्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ६० वर्षांपूर्वी जसे डोंबिवलीत खड्डे होते, तशी परिस्थिती असल्याची भावना व्यक्त करीत सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. इस्रोने चंद्राऐवजी कल्याण-डोंबिवलीत यान पाठवायला हवे होते. चांद्रयान आणि खड्डे अशी एकच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, यातून सत्ताधारी आणि प्रशासन ढिम्म असल्याचंच दिसून आलं. सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही कल्याणमधील ‘नाटय रसिक उत्तम आहेत, पण रस्ते थर्डक्लास’ असल्याची टीका केली होती. अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनीही रस्त्यांच्या खड्डयांवरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावीत नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा :- राज ठाकरे विधानसेभेचा निर्णय उद्या सांगणार

बाप्पांचं आगमन आणि विसर्जनही खड्ड्यांतूनच!

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच टीकेची झोड उठवल्यानंतरही पालिका प्रशासन अणि सत्ताधारी ढीम्मच होते. पालिका अधिकाऱ्यांनी तर पालिका हद्दीतील रस्त्यांपेक्षा एमएसआरडीसीच्या रस्त्यांवरील खड्डे मोठे असल्याचे सांगत अकलेचे तारे तोडले होते. गणेशाचे आगमन आणि विर्सजनही खड्डयातूनच झाले. मात्र, पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यात आले नाहीत. पण बुधवारी आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा डोंबिवली आणि ग्रामीण भागात असल्याने सकाळपासूनच पालिका प्रशासनाने कल्याण शीळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कर्मचारी जुंपले होते. तसेच, डोंबिवलीत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जंतूनाशक पावडर फवारणी करण्यात आली होती. रस्त्यावरील कचराही उचलण्यात आला होता. सर्वत्रच स्वच्छता होती. त्यामुळे सामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email