Dombivali ; चुकीच्या दुभाजकामुळे होताहेत अपघात

डोंबिवली दि.११ :- शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांमध्ये डोंबिवली पूर्वेतील पेंढरकर महाविद्यालय रस्त्याची गणना होत असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ वाहनांची प्रचंड वर्दळ असते. पेंढरकर महाविद्यालय रोडवर रोटरी उद्यानासमोर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. दर एक-दोन दिवसांच्या फरकाने याठिकाणी अपघात होत आहेत. दुभाजकाची रचना योग्यप्रकारे नसल्याने यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. संबंधित दुभाजक बांधताना तो योग्य प्रकारे बांधला गेलेला नाही.

हेही वाचा :- ठामपा सुरक्षा अधिकाऱ्याची दारू पिऊन सुरक्षाचे कर्तव्य

त्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत असून तो केवळ रोटरी उद्यानासमोरील भागापर्यंतच सीमित ठेवण्यात आला आहे. दुभाजक पेंढरकर महाविद्यालयापर्यंत असायला हवा होता, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर लहान मुलांचे खेळण्याचे उद्यान असल्याने दुभाजक बांधण्यात आला असला तरी त्याच्यावर वाहने आदळून अपघात होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ज्या रस्त्यावर हा दुभाजक आहे, तो केडीएमसीच्या हद्दीत असला तरी त्याची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) आहे. रस्त्यावर पथदिव्यांची सुविधा आहे, पण रात्री येथे सदैव अंधाराचे साम्राज्य असते. यात दुभाजक दिसत नाही.

हेही वाचा :- उच्चदाब ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे वीजबील भरताना खबरदारी घ्यावी : महावितरणचे आवाहन

त्यामुळे वाहने दुभाजकावर आदळण्याचे प्रकार घडत आहेत. काही वाहने तर दुभाजकावर चढल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, सातत्याने घडणारे अपघात पाहता काही महिन्यांपूर्वी ज्याठिकाणी वाहने आदळतात तेथे धोकादायक सूची लावली गेली होती. पण ती गायब झाल्याने पुन्हा अपघात वाढले आहेत. या परिसरात छोटी हॉटेल्स आहेत, तसेच सायंकाळी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लागतात.या परिसरात संध्याकाळी वाहनांची वर्दळ असते. येथे महाविद्यालय असून एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे मुख्य कार्यालयही आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email