नागरिकांची आकडेवारी आणि माहिती संकलित करण्यासाठी ओला, उबेरसारख्या स्वयं उद्योगांची मदत घेणार
Hits: 0
मुंबई दि.२३ :- कागदाच्या वापरापासून डिजिटल व्यवहारांकडे होणारा बदल कृत्रिम बुद्धीमत्तेचा तसेच मशीनचा वापर आणि मनुष्यबळाची कमतरता अशी आव्हाने आज एनएसओ म्हणजेच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयासमोर आहेत आणि या आव्हानांवर मात करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार टोपरानी यांनी दिली. या विभागाच्या प्रादेशिक शिबिराचे आज नवी मुंबईतल्या बेलापूर कार्यालयात उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा :- कल्याणच्या स्वीट मार्टमध्ये अग्नितांडव
25 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात सांख्यिकी विभागाच्या पश्चिम कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच सांख्यिकी सर्वेक्षणादरम्यान भविष्यात येणाऱ्या अडचणींवर या शिबिरात चर्चा होईल. सुमारे 100 हून अधिक अधिकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत. या विभागामार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातल्या कंपन्यांकडून मनुष्यबळाची आकडेवारी आणि माहिती संकलित केली जाते. या संकलित माहितीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी होतो. यासाठी सांख्यिकी विभाग विविध क्षेत्रांकडून वैयक्तिक तसेच कंपन्यांचे आकडे मागवत असते.
हेही वाचा :- उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेवर बलात्कार
आता उबेर आणि ओला अशा टॅक्सी सेवांकडूनही सरकार ही आकडेवारी घेईल असे टोपरानी यांनी सांगितले. हे सर्वेक्षण सहा महिने चालेल. या सर्वेक्षणाअंतर्गत असंघटित,अकृषक अशा क्षेत्रातल्या म्हणजेच उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातल्या संस्थांची कार्यालयीन आणि आर्थिक आकडेवारी संकलित केली जाईल. हे सर्वेक्षण डिजिटल माध्यमातून केले जाईल असेही त्यांनी सांगितले. सरकारची धोरणं आणि योजना निश्चित करण्यासाठी अशा सर्वेक्षणांची अत्यंत आवश्यकता असते. अचूक सर्वेक्षणातून सरकारला योग्य धोरण ठरवता येते.